स्त्रीचा संघर्ष

प्रत्येक वादळाशी लढताना ती
स्वतःला मजबूत बनवते.. अश्रू लपवून चेहर्‍यावर हसू मात्र कायम ठेवते… स्त्री ही कधीच कमकुवत नसते. ती तर नवजीवनाची जननी असते. तिच्या श्रम आणि सहनशीलतेसमोर मोठ्यातली मोठी संकटेही लहान असतात. स्त्री ही घराची शोभा असते. सकाळी उठल्यानंतर ती घराचा कोपरा आणि कोपरा साफ करते म्हणजे ती एक प्रकारे घरातली दरिद्री दूर करत असते.
पहाटे अंगणापुढे रांगोळी आणि दिवा लावून ती अंगणात शोभा तर आणतेच; परंतु ती घरातली लक्ष्मीचं असते. एक दिवस बाई घरात नसू द्या बरे त्या घराचा नक्षासंध्याकाळपर्यंत काय होईल, हे काय कुणाला सांगायची गरज अजिबात नाही. घरातल्या न्हाणीधुणी व अंगणात सडारांगोळी झाल्यानंतर देवपूजा, पोथी या तिच्या भक्तिरूपातून ती जणू काही देवीदेवतांना संकटे पेलण्याचे आणि आपले कुटुंब सुरक्षित राहण्याचे आव्हान जणू काही देवाला करत असते. ती जेव्हा घरच्यांसाठी जेवण बनवते तेव्हा तिच्या रूपात अन्नपूर्णा प्रसन्न असते. घरातला नीटनेटकेपणा घराची सजावट येणारे जाणारे पाहुणे मंडळीनां सांभाळणे घरातली सर्व कामे करून घरातल्या प्रत्येक नात्याचा सन्मान जपणे आणि सन्मान करणे या सगळ्या कला स्त्रीमध्ये अवगत असतात. ती दिवसभर कितीही दमलेली असो तरी घरातल्या सर्व मंडळींची सेवा ती मुकाट्याने करत असते. केवळ पतीप्रेमासाठी आणि संध्याकाळी पतीराव घरी आल्यावर म्हणतात तुला काय काम असते बरे?.. तू काय करतेस दिवसभर?… मी रोज ऑफिसला जाऊन काम करून किती दमतो. तुला काय कळणार? परंतु प्रत्येक नवर्‍याने बायको माहेरी गेल्यावर….
तू नसतेस घरी जेव्हा…
जीव तुटका तुटका होतो…
हे गोड गाणे जरूर ऐकावे.
एकट्या स्त्रीलाच जगत्जननी म्हणतात.
स्त्री अंबा, जगदंबा, दुर्गा, सावित्री, सीता, अशी अनेक रूपे स्त्रीला वर्णिली जातात. एकट्या स्त्रीचा संघर्ष हा जणू कुटुंबाचा आधार असतो जगण्याचा. तिच्या छाया-सावलीत पदरात एक मायेची ऊब असते.
स्त्रीशिवाय देव्हारा, तुळस, अंगण आणि घरपण सुनेसुने असते. ज्या घरात स्त्री नसते त्या घरातले घरपण जणू जंगलासारखे विरान असते.
स्त्री म्हणजे घरात फुलाप्रमाणे दरवळणारा सुगंध असतो. अशा बर्‍याच माझ्या माता- भगिनी अगदी उत्साहाने उमेदीने रोज नव्या उत्साहात काम करताना दिसतात.जीवनाशी हसत-हसत दोन हात करताना दिसतात. अशा लढवय्या स्त्रीशक्तीला माझा सलाम!

A Woman’s Struggle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *