अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. विविध भागांत करण्यात आलेल्या तपासणीत संशयित अन्नपदार्थांचा एक लाख 19 हजार 712 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अनेक ठिकाणी विनापरवाना व्यवसाय, भेसळीचा संशय, तसेच अनारोग्यकारक परिस्थितीत अन्न उत्पादन होत असल्याचे तपासणीत उघड झाले.
अन्न व औषध प्रशासनाने 27 मे रोजी नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध भागांत तपासणी मोहीम राबवली. जेलरोड, नाशिकरोड येथील मे. अजनी ट्रेडर्स या आस्थापनात विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. येथे विक्रीसाठी ठेवलेल्या स्टिंगफ कॅफिनेटेड बेव्हरेज आणि एनर्जी ड्रिंकच्या बाटल्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 31 हजार 680 रुपयांच्या एक हजार 584 बाटल्या जप्त केल्या.
पंचवटी मार्केट यार्ड परिसरातील मे. नेहा फूड प्रॉडक्ट्स येथेही विनापरवाना अन्नपदार्थ विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. मैदा पापड व स्नॅक्सचे नमुने तपासणीसाठी घेऊन 13 हजार 568 रुपयांचा 336 किलो साठा जप्त करण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथील मे. बालाजी ट्रेडिंग कंपनीत खुल्या स्वरूपात रिफाइंड सोयाबीन तेल विक्री होत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. संबंधित तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवून 68 हजार 864 रुपयांचा 430 किलो साठा प्रशासनाने ताब्यात घेतला. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील मे. गुरुदत्त छाया डेअरी येथे अत्यंत अनारोग्यकारक परिस्थितीत पनीर उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळे. दहा किलो पनीरचा साठा जप्त करून तत्काळ नष्ट करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील मे. स्वामी बेव्हरेजेस येथे स्वीटनड कार्बोनेटेड बेव्हरेजेसच्या बाटल्यांचे नमुने तपासणीसाठी घेऊन संशयित साठा जप्त केला. तपासणीत घेण्यात आलेले सर्व नमुने अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी दिली.
ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत येलमामे, गोविंदा गायकवाड, प्रतीक भड, सुहास मंडलिक व संदीप तोरणे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप, संदीप देवरे व दिनेश तांबोळी यांच्या उपस्थितीत पार पाडली.
अशी केली कारवाई
♦ एकूण जप्त साठा : एक लाख 19 हजार 712 रुपये.
♦ विनापरवाना व्यवसाय करणार्या आस्थापनांवर कारवाई.
♦ एनर्जी ड्रिंक, पापड, स्नॅक्स, सोयाबीन तेल व पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठविले.
♦ मुंढेेगाव येथे अनारोग्यकारक परिस्थितीत तयार होणारे पनीर नष्ट.
♦ विश्लेषण अहवालानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार.
Food items worth Rs 1.19 lakh seized