समृद्धी महामार्गावर ट्रक 30 फूट खोल डकमध्ये कोसळून खाक

चालक-क्लीनर थोडक्यात बचावले; एक कोटीचे नुकसान

सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील सोनांबे शिवारात शुक्रवारी (दि.29) पहाटे थरारक घटना घडली. अज्ञात लुटारूंनी मालवाहू ट्रक लुटण्याच्या उद्देशाने चालक आणि क्लीनरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने 14 टायरचा ट्रक थेट 30 फूट खोल काँक्रीट डकमध्ये कोसळून पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत ट्रकसह सुमारे 70 लाखांचा माल जळून खाक झाला असून, एकूण नुकसान जवळपास एक कोटी रुपयांचे झाले आहे.
मुंबईहून रायपूरकडे ट्रक (एमएच 49 एटी 9999) कपड्यांच्या गाठी, मिक्सर, पत्त्यांचे कॅट आणि घरगुती साहित्य घेऊन निघाला होता. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरवरील किलोमीटर 579.7 परिसरात काही अज्ञात लुटारूंनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक राज बहादूर गंगाप्रसाद यादव (23, रा. बरेठी, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) याने ट्रक न थांबवल्याने लुटारूंनी दगडफेक सुरू केली. यामध्ये चालक जखमी झाला. तर क्लीनर ब्रह्मा हिरालाल जाटव (40, रा. डिघरूआ, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) यांच्या डोक्यावर लोखंडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक संरक्षक कठडे तोडून थेट काँक्रीटच्या डकमध्ये कोसळला. काही क्षणांतच ट्रकने पेट घेतल्याने परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरले.
ट्रकमधील ज्वलनशील साहित्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. तब्बल 20 तास ट्रक धुमसत राहिला. या दुर्घटनेत ट्रकसह संपूर्ण माल जळून खाक झाला. या घटनेनंतर सिन्नर पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरोधात तपास सुरू केला असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Truck falls into 30-foot deep ditch on Samruddhi Highway

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *