सहा टक्के सवलतीसाठी अखेरचे दोन दिवस
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मिळकतदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेने करसवलत योजना सुरू केली आहे. एप्रिलमध्ये आठ टक्के सूट दिल्यानंतर चालू मे महिन्यात सहा टक्के सूट देण्यात आली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत दोन लाख मिळकतदारांनी 101 कोटींचा कर भरून त्यावर चार कोटींची सवलत पदरात पाडून घेतली आहे. मिळकतदारांना सहा टक्के कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी अखेरचे दोनच दिवस म्हणजेच रविवार(दि.31)पर्यंतची मुदत आहे.
शहरात सहा लाख 27 हजार मिळकतदार असून, त्यांच्याकडून चालू व मागील थकबाकी अशी एकुण तब्बल नऊशे कोटींची वसुली करण्याचे आव्हान कर संकलनसमोर आहे. सहाशे कोटींची रक्कम मागील थकबाकी असून, त्यात शास्तीची रक्कम चारशे कोटी एवढी असल्याने थकबाकीचा फुगवटा सहाशे कोटींच्या घरात पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासन दरवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान करसवलत देण्याबरोबरच सप्टेंबरमध्ये अभय योजनेची अंमलबजावणी करते. कर संकलनला यंदा 226 कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट असले तरी, मनपा आयुक्तांंनी चालू मागणीसह मागील थकबाकी असे एकूण साडेतीनशे कोटींचे टार्गेट दिले आहे. एप्रिल महिन्यात मिळकतदारांनी कर भरण्याला चांगला प्रतिसाद दिल्याने वसुलीचा आकडा 76 कोटींच्या घरात गेला होता. परंतु, मेमध्ये शुक्रवार(दि.29) पर्यंत पंचवीस कोटी वसुली झाली आहे. दोन महिन्यांची वसुली 101 कोटींवर गेली आहे. सोमवार(दि.1)पासून करवसुलीवर तीन टक्केच सूट मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त तीन टक्के करसवलतीचा लाभ मिळकतदारांना घ्यायचा असेल तर रविवारपूर्वी कर भरावा लागणार आहे.
महापालिकेने मिळकतदारांसाठी दिलेल्या कर सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सहकार्य करावे. कर सवलत देऊनही मिळकतदारांनी त्यांच्याकडील थकबाकीसह चालू कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– अजित निकत, उपायुक्त, करसंकलन, नाशिक
एप्रिल-मे महिन्यातील विभागवार वसुली
विभाग एकूण भरलेली रक्कम मिळवलेली सूट
सातपूर 12,13,52,303 60,62,649
नाशिक पश्चिम 17,30,74,248 94,92,322
नाशिक पूर्व 15,69,10,623 80,04,716
पंचवटी 17,57,13,838 82,26,626
नवीन नाशिक 21,14,08,156 1,14,03,945
नाशिकरोड 16,84,55,452 69,84,924