पुढील महिन्यात निर्णय होण्याची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवलेल्या नऊ हजार पदांच्या आकृतिबंधावर पुढील महिन्यात मंजुरीची मोहर पडण्याची शक्यता आहे. शासनाने महापालिकेला चार ते पाच वेळा आकृतिबंधात दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मनपाने शासनाला सुधारित आकृतिबंध सादर केला आहे. तांत्रिक दुरुस्त्या सुधारून शासन दरबारी हा आकृतिबंध सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यास महापालिकेसमोरील भविष्यातील नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिकेकडून 2023 पासून आकृतिबंधासाठी पाठपुरावा सुरू आहे. 2024 मध्ये प्रशासकीय राजवटीतील महासभेने आकृतिबंधाला मंजुरी दिल्यानंतर तो शासनाकडे पाठवण्यात आला होता. तेव्हापासून ते आजतागायत आकृतिबंधासाठी पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी 1996 मध्ये महापालिकेच्या 7,092 पदांच्या पहिल्या आकृतिबंधाला मंजुरी मिळाली होती. त्यावेळी महापालिकेचा समावेश क वर्गात होता. कालांतराने शहराचा विस्तार वाढला. लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा-सुविधांची महापालिकेवरील जबाबदारी वाढली. दरम्यान, दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी, कर्मचार्यांच्या रिक्तपदांची संख्या मात्र तीन हजार 100 वर आली आहे. महापालिकेची क वर्गातून ब वर्गात पदोन्नती झाली. मात्र, कर्मचारी संख्या रोडावल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. कोरोनानंतर शासनाने आरोग्य, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित 625 नवीन पदांना मंजुरी दिली. त्यामुळे आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदांची संख्या 7,700 वर पोहोचली. 2017 मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अवाढव्य असा 14,400 पदांचा नवीन आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. पण शासनाने तो नाकारला. त्यानंतर सुधारित आकृतिबंध तातडीने सादर करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेला दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने महापालिकेतील 49 विभागांना आवश्यक पदे, व्यपगत होणारी पदे, मंजूर पदे, कालबाह्य ठरलेली पदे असा अनुक्रम देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्व विभागांकडून प्राप्त माहिती आधारे नऊ हजार पदांचा एकत्रित प्रस्ताव पाठवण्यात आला असता, त्यास आता मंजुरी मिळ्ण्याची दाट शक्यता आहे.
सात हजार कर्मचार्यांचा भार तीन हजार कर्मचार्यांवर
महापालिकेत सात हजार 700 पदे मंजूर असून, त्यांपैकी अवधे तीन हजार 100 एवढेच कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी कर्मचार्यांवर कामाचा ताण पडतो आहे. मात्र, आकृतिबंधास मंजुरी मिळाल्यानंतर 25 वर्षांपासून रखडलेल्या भरतीला मुहूर्त लागणार आहे.
Stamp of approval on the municipal corporation’s outline?