क्रेनच्या धडकेत मालेगावच्या दोघांचा मृत्यू

राहूड घाटातील घटना, दोन जखमी

चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहूड घाट परिसरात मंगळवारी (दि. 2) झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील दोन जणांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव येणार्‍या एका महाकाय क्रेनने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही वाहने अक्षरशः चिरडली गेली.
या दुर्घटनेत अब्दुल कयुम अब्दुल रजाक (वय 62) आणि अब्दुल अहिल अब्दुल रहमान (वय 11, रा. मोहननगर, मालेगाव) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. योगेश अशोक बाविस्कर (वय 25) आणि बारकू सुभाष वैद्य (30, दोघे रा. खडकी, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहूड घाटातील तीव्र उतारावर गतिरोधक असल्याने समोरील काही वाहनांनी आपला वेग कमी केला होता. याचवेळी पाठीमागून येणार्‍या महाकाय क्रेनच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हलगर्जीपणाने चालवून समोरील वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेची तीव्रता इतकी होती की, लहान वाहने क्रेनखाली चिरडली गेली आणि त्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकानेही तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, चांदवड पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रेनचालकाला ताब्यात घेतले आहे.
अतुल संजय सिंह (वय 22, रा. बडवालिया, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास चांदवड पोलिस करीत आहेत.

राहूड घाट बनतोय मृत्यूचा सापळा?

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहूड घाटात वारंवार घडणार्‍या भीषण अपघातांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटातील तीव्र उतार, वाढती वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ आणि काही वाहनचालकांचा निष्काळजीपणा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मंगळवारी (दि. 2) झालेल्या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा या घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, नियमित वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षाविषयक सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Two from Malegaon die in crane accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *