जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 5.52 कोटींचा निधी

सिन्नर तालुक्यातील 10 शाळांसह जिल्ह्यातील 59 शाळांना लाभ

सिन्नर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांच्या विशेष दुरुस्तीसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 5 कोटी 52 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लेखाशीर्ष 2202 जे 448
मधून हा निधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील 59 शाळांच्या दुरुस्तीची कामे मार्गी लागणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, निधीचे वितरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे.
या योजनेमुळे शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, गळती रोखणे, वर्गखोल्यांचे नूतनीकरण, स्वच्छतागृहांची सुधारणा तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सिन्नर तालुक्यातील 10 शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, यात जि.प. प्राथमिक शाळा कासारवाडी, जि.प. प्राथमिक शाळा काजीपुरा उर्दू, जि.प. प्राथमिक शाळा खडांगळी, जि.प. प्राथमिक शाळा फर्दापूर, जि.प. प्राथमिक शाळा देवपूर, जि.प. प्राथमिक शाळा चिने वस्ती (पाथरे बु.), जि.प. प्राथमिक शाळा सोमठाणे, जि.प. प्राथमिक शाळा दहिवाडी, जि.प. प्राथमिक शाळा भरतपूर, जि.प. प्राथमिक शाळा धारणगाव या शाळांचा समावेश असून, यामुळे सिन्नर तालुक्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

निधी खर्चासाठी एक वर्षाची मुदत

सदर निधी व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट प्रणालीद्वारे उपलब्ध होणार असून, निधी प्राप्त झाल्यानंतर तो केवळ एका वर्षाच्या कालावधीत खर्च करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागांनी कामे वेळेत पूर्ण करून निधीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ग्रामीण शिक्षणाला बळ

जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांची दुरवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असून, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला मोठे बळ
मिळणार आहे.

District. P. Fund of 5.52 crores for the repair of schools

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *