मालेगावात प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू

नवजात बालक गोणीत भरून नेण्यास सांगितल्याचा आरोप

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील मच्छी बाजार परिसरातील सिद्दिकी मॅटर्निटी होममध्ये प्रसूतीसाठी दाखल केलेल्या नूरजहान मोहम्मद याकूब (वय 32) या महिलेचा आणि तिच्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नूरजहान यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर फातिमा सिद्दिकी यांच्या मॅटर्निटी होममध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी सामान्य प्रसूतीचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रसूतीदरम्यान नूरजहान यांना प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही त्यांना वेळेत उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात आले नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रसूतीदरम्यान जन्माला आलेले बाळ मृतावस्थेत होते, तर काही वेळातच अतिरक्तस्त्रावामुळे नूरजहान यांचाही मृत्यू झाला.
संबंधित डॉक्टरांकडे कोणतीही आवश्यक वैद्यकीय पदवी नसतानाही हे मॅटर्निटी होम बेकायदेशीररीत्या चालविले जात होते, असा आरोप केला जात आहे. माता व बालकाचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या डॉक्टरांनी मृतदेह तातडीने रुग्णालयातून बाहेर नेण्यास सांगितले, इतकेच नव्हे तर मृत नवजात बालकाला प्लास्टिकच्या गोणीत भरून नेण्यास सांगितल्याचा अत्यंत अमानुष आरोप नातेवाइकांनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिक आणि नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. पवारवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असून, वैद्यकीय अहवालानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.

Mother and child die during childbirth in Malegaon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *