महाजन-सामंत यांच्यात खलबते

विधान परिषद निवडणूक : दराडेंसाठी सामंतांनी ठोकला तळ

नाशिक : वार्ताहर
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाचे गणित जुळवण्यासाठी आणि संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला असून, बंद दाराआड राजकीय खलबतांना वेग आला आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात सुमारे दोन तासांहून अधिक काळ बैठक सुरू होती. या बैठकीत निवडणुकीतील राजकीय समीकरणे, मतांची जुळवाजुळव तसेच अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही मंत्र्यांकडून प्रसाद हिरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यातून अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याचे समजते.
दरम्यान, विधान परिषद अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांच्यासोबतही दोन्ही मंत्र्यांची चर्चा झाली. बैठकीतून कोणता मार्ग निघतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच, प्रसाद हिरे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याची चर्चा रंगली आहे. उद्या सकाळी 11 वाजता गिरीश महाजन आणि प्रसाद हिरे यांच्यात पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघतो का, आणि विधान परिषद निवडणुकीतील समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.
सध्या मात्र महाजन आणि सामंत यांच्यातील बैठकीचे सत्र सुरू असून, नाशिकच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दोन्ही उमेदवारांबाबत सकारात्मक मार्ग निघेल
: मंत्री उदय सामंत
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीच्या चर्चांबाबत मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. महायुतीत शिवसेनेला जागा सुटल्यानंतर काही नाराज इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुरू असून, त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळ गिते, प्रसाद हिरे आणि गणेश गिते यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगत सामंत म्हणाले की, संबंधित उमेदवारांनी त्यांची भूमिका मांडली असून, त्यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. उद्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडूनही त्यांच्याशी चर्चा होणार आहे. “आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांना विनंती केली आहे. चर्चा कुठेही नकारात्मक झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही गिरीश महाजन यांनी संवाद साधला आहे. त्यामुळे मी आशावादी असून, सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे,“ असे सामंत यांनी सांगितले. गणेश गिते किंवा गोकुळ गिते यांना कोणतेही पद अथवा इतर आश्वासन देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकीय भविष्याबाबत चर्चा झाल्याचे नमूद केले. सोशल मीडियावर संबंधित नेत्यांविरोधात आर्थिक व्यवहारांच्या अफवा पसरवून बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. नाशिकची ही निवडणूक राज्यासह राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली असून, महायुतीचे वरिष्ठ नेते याकडे लक्ष ठेवून असल्याचे सामंत यांनी सांगितले. “गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत. आज परिस्थिती अधिक सकारात्मक दिसेल,“ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tensions between the lord and the feudal lord

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *