नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार
नाशिकरोड : प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांनी पालकांच्या कष्टाची जाण ठेवून उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेमध्ये दाखल व्हावे. समाजसेवा करावी, कुटुंबाचा व देशाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ. प्रज्ञा त्रिभुवन
यांनी केले.
नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा कुलथे मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. नाशिकरोड घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे सहाय्यक अधीक्षक शरद जाधव अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेते पहाटे उठून शेवटचा पेपर वाचकांपर्यंत पोहोचेपर्यंत अपार कष्ट करतात. त्यांच्या पाल्यांनी त्यांचा आदर्श घेऊन चांगला अभ्यास करावा. वृत्तपत्र विक्रेत्यांची कामे तडीस नेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवणारी वृत्तपत्र विक्रेते महेश नांदुर्डीकर यांची कन्या श्रावणीचा सत्कार प्रज्ञा त्रिभुवन यांच्या हस्ते झाला. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते आणि वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत चिमाजी भांड यांचा सत्कार शरद जाधव यांनी केला. संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
बालवाडीपासून इंजिनिअर, डॉक्टर शिक्षण घेत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा सत्कार विविध दैनिकांच्या प्रतिनिधींच्या हस्ते तसेच शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी ठाकरे, रेल्वे कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे, राजेंद्र ट्रान्स्पोर्टचे नारायण डहाळे, समर्थ गिफ्ट सेंटरचे संचालक दीपक डहाळे यांच्या हस्ते वृत्तपत्र गुणवंत पाल्यांचा शालोपयोगी वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेते उल्हास कुलथे यांच्या मातोश्री लिलाबाई कुलथे यांच्या स्मरणार्थ गणपती व सरस्वतीची चांदीची प्रतिमा हिराबाई रहाडे व लक्ष्मीबाई ओहळ यांच्या हस्ते तसेच भगवान बालाजीची चांदीची प्रतिमा ज्योती कुलथे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलांना देण्यात आली. वृत्तपत्र विक्रेत्या कुटुंबीयांसाठी संगीत खुर्ची, टोपीवर टोपी, बिस्कीट खाणे आदी स्पर्धा झाल्या. विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष रवी भोसले, महेश कुलथे, बाबासाहेब ओहोळ, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, माजी अध्यक्ष विजय सोनार, किशोर सोनवणे, वृत्तपत्र विक्रेते अनिल कुलथे, विकास रहाडे, वसंत घोडे, हर्षल ठोसर, संदीप परसे, बाजीराव डहाळे, जय भालेराव आदींनी परिश्रम घेतले. महेश कुलथे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
Children of newspaper sellers should join administrative service