अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील सुमारे 80 टक्के रस्त्यांवर विविध विकासकामांच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालक व व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी मूळ ठेकेदारांनी कामे सबठेकेदारांना दिली आहेत. मात्र, सबठेकेदारांना वेळेवर पैसे न मिळाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी कामे बंद केली होती. त्यानंतर कामे पुन्हा सुरू झाली असली, तरी अत्यंत संथगतीने आणि अपुर्या मनुष्यबळासह सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरात पावसाळा तोंडावर असताना अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याने गंभीर दुर्घटनांची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खोदकाम केलेल्या भागात योग्य सुरक्षाव्यवस्था आणि सूचनाफलक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्ते खोदून ठेवल्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहेत. ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने अनेक व्यापार्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. दुकानाचे भाडे, कर्मचार्यांचे वेतन व इतर खर्च भागवताना व्यापार्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाने विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, तसेच व्यापारी व नागरिकांच्या अडचणींची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला.
याप्रसंगी मनोज घोडके, मिलिंद कांबळे, सत्यम खंडाळे, अमित गांगुर्डे, कौशल पाटील, अविनाश पाटील, राहुल पाटील, संतोष कोरडे, राकेश परदेशी, उदय देशमुख, वर्धमान संचेती व किरण क्षीरसागर यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
Get road works underway.