पूर्व घाट मार्गांवरील कामे अंतिम टप्प्यात

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढती वाहतूक आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून पूर्व विभागातील दोन महत्त्वाच्या घाट मार्गांवरील युटिलिटी कामांना वेग देण्यात आला आहे. लेखानगर एनएच-3 ते कलानगर चौक, वडाळागाव, रवीशंकर मार्ग ते विजय-ममता चौक या सुमारे 4.290 किलोमीटर लांबीच्या मार्गासह विजय-ममता चौक ते टाकळी गाव ते संगम पूल या 2.053 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील विविध सुविधा उभारणीची कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पावसाळ्यापूर्वी सर्व प्रमुख कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. हे दोन्ही मार्ग घाट परिसर, साधुग्राम तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. पहिल्या मार्गावर ऑप्टिकल फायबर केबल, महाआयटी सीसीटीव्ही, एमएनजीएल गॅस पाइपलाइन, सांडपाणी वाहिनी, पाणीपुरवठा वाहिन्या आणि पर्जन्यजल वाहिन्यांची कामे सुरू आहेत. यापैकी सांडपाणी वाहिनी आणि नियमित पाणीपुरवठा वाहिनीची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. ऑप्टिकल फायबर आणि गॅस पाइपलाइनची कामेही पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुकणे-गंगापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. दुसर्‍या मार्गावर ऑप्टिकल फायबर व सीसीटीव्हीचे काम पूर्ण झाले आहे. पर्जन्यजल वाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पर्जन्यजल वाहिनीच्या कामांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या मते, या दोन्ही मार्गांवरील युटिलिटी कामे पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला मोठी मदत होणार आहे. विशेष करून देशभरातून येणार्‍या भाविकांना कुंभमेळ्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी या कामांचा दर्जा उच्च राखला जात आहे. यासाठी महापालिका प्रशासन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांमधील समन्वय साधून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करीत आहे.

घाटांना जोडणार्‍या कामांना गती
पूर्व विभागात दोन प्रमुख घाट जोडणार्‍या मार्गांवरील कामांना गती एकूण सुमारे 6.343 किलोमीटर मार्गांवर युटिलिटी सुविधा उभारणी ओएफसी व महा आयटी सीसीटीव्हीची बहुतांश कामे पूर्ण एमएनजीएल गॅस पाइपलाइन अंतिम टप्प्यात मुकणे-गंगापूर पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू पावसाळ्यापूर्वी पर्जन्यजल वाहिन्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.

आतापर्यंत करण्यात आलेल्या रस्तेकामात नाशिककरांना समोर ठेवून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही, याचा सारासार विचार करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी तसेच नाशिकचा त्यादृष्टीने विकास करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा

Work on Eastern Ghat roads in final stage

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *