नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थापूर्वी द्वारका येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने द्वारका ते नाशिकरोड येथील दत्त मंदिरापर्यंतच्या महामार्ग कामाचे नियोजन केले आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत महामार्गास मंजुरीसह निधीची मागणी केली असता, काही दिवसांतच या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पालिका प्रशासनाने या कामाला गती दिली असून, पहिल्या टप्प्यात सहापदरीचे काम उरकले जाणार आहे व उर्वरित भूसंपादन करून आठपदरीचे काम मार्गी लावले जाईल.
भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता, या महामार्गाची अंतिम रुंदी 45 मीटरपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक अतिरिक्त जमीन टप्प्याटप्प्याने संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात भूसंपादनाचा आर्थिक भार टाळत प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, रुंदीकरणासाठी लागणार्या काही जागांमध्ये व्यावसायिक आस्थापना, निवासी मालमत्ता आणि इतर बांधकामांचा समावेश असल्याने संपादन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. द्वारका सर्कल ते उपनगर-दत्त मंदिर चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या रुंदीकरण प्रकल्पात आता भूसंपादनाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. सुमारे 221 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने ऑनलाइन निविदा प्रसिद्ध केली असून, पहिल्या टप्प्यात उपलब्ध जागेत सहापदरीकरणाचे काम केले जाणार आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार प्रारंभी सुमारे 30 मीटर रुंदीमध्ये तीन अधिक तीन अशा सहापदरी रस्ता विकसित केला जाईल. यामध्ये डांबरीकरण, अस्तरीकरण, वाहतूक सुविधा आणि आवश्यक सेवा मार्गांचा समावेश असेल.
भविष्यातील वाहतुकीचा विचार करून आठपदरीकरणासाठी आवश्यक भूसंपादन टप्प्याटप्प्याने केले जाईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध रुंदीमध्ये सहापदरीकरणाचे काम प्राधान्याने केले जाणार आहे.
– प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त
Work on the six-lane road in the first phase of Dwarka.