मंदिराचे चिरे खिळखिळे होण्याचा धोका

पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी?

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूला दर्शनपथाचे काम सुरू झाले आहे. दर्शनपथसाठी अत्याधुनिक मशिनरीने सिमेंट काँकीटचे खांब उभारणी करण्यात येत आहे. आरसीसी कॉलम उभारणी करताना जमिनीत खोदकाम करत पायाभरणी करतात. त्यावर सिमेंट काँक्रीटचे खांब उभे करण्यात येतात. दर्शनपथाचे खांब उभारणी करताना 30 मीटरपेक्षा जास्त खोल पोकलेन अथवा बोअरवेलसारख्या यंत्राने जमिनीत खोलवर फुटिंग घेण्यात येत आहे. त्यासाठी होत असलेले खोदकाम मंदिर वास्तूला घातक ठरेल असे आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे. नियमाप्रमाणे मंदिराच्या कोटापासून 100 मीटर दूर अंतरावर कोणतेही खोदकाम करता येत नाही. बांधकामदेखील प्रतिबंधित आहे. तसेच 200 मीटर व 300 मीटर अंतरासाठीदेखील अटी-शर्ती असलेले नियम लागू आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम करावयाचे असल्यास भारतीय पुरातत्त्व विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाने सुरू केलेल्या कामाला अशा प्रकारचे कोणत्याही नियमांचे बंधन नसावे असे दिसते.
त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांनी घरात मोरी बांधली तरीदेखील पुरातत्त्व विभागाची नोटीस मिळते. मंदिराच्या जवळपास असलेल्या इमारतींना छताचे पत्रे बदलणे, घराची पायरी दुरुस्ती करणे यांसारख्या डागडुजीच्या आवश्यक कामांनादेखील परवानगी मिळत नाही, असा अनुभव येथील मालमत्ताधारक नागरिकांना वेळोवेळी आला आहे.
खांबाच्या उभारणीसाठी मंदिराच्या पूर्व बाजूला यंत्रांनी होणारे खोदकाम मंदिर वास्तूला हादरे देत आहे व त्यामुळे दगड खिळखिळे होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून कायद्याचा धाक दाखवणारे पुरातत्त्व
सर्वेक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी अद्यापपर्यंत लक्ष दिलेले नाही.
सुमारे 300 वर्षांची प्राचीन मंदिर वास्तू खिळखिळी झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. यापूर्वी नारायण नागबळी धर्मशाळा इमारत केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून बांधण्यात आली, तेव्हादेखील नियमांना बगल दिली असल्याचे दिसते.

 

Risk of the temple’s stone blocks becoming loose.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *