फिफा महाकुंभ 2026

– रमेश शेजवळ

जगातील सर्वांत मोठ्या जागतिक महाकुंभापैकी एक असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला 11 जूनपासून सुरुवात होत आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) या जागतिक संस्थेच्या अधिपत्याखाली दर चार वर्षांनी हा महाकुंभ भरतो. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. त्यामुळे विश्वचषकाला केवळ स्पर्धा नव्हे, तर जागतिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोट्यवधी चाहते दूरचित्रवाणी, मोबाइल आणि डिजिटल माध्यमांतून प्रत्येक सामन्याचा आनंद घेत असतात.

ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगाल यांसारख्या बलाढ्य संघांना जगभर पाठिंबा मिळतो. अनेक चाहत्यांसाठी त्यांचा आवडता संघ किंवा खेळाडू हा भावनांचा विषय असतो. त्यामुळे विश्वचषकादरम्यान विजयाचा आनंद आणि पराभवाचे
दुःखही तितक्याच तीव्रतेने अनुभवले जाते.
यंदाचा फिफा विश्वचषक अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे. प्रथमच 48 देश स्पर्धेत सहभागी होत आहेत. याशिवाय अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे यजमानपद भूषवत आहेत. फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन देश मिळून विश्वचषक आयोजित
करत आहेत.
विश्वचषकात स्थान मिळवणे सोपे नसते. यजमान देश वगळता सर्व संघांना पात्रता फेर्‍यांच्या कठीण प्रक्रियेतून जावे लागते. यावेळी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांना यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला, तर उर्वरित 45 देशांनी पात्रता सिद्ध करून अंतिम फेरी गाठली. हे सर्व संघ आता जगज्जेतेपदासाठी आपले सर्वस्व पणाला
लावणार आहेत.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
2026 च्या विश्वचषकात एकूण 104 सामने खेळवले जाणार असून, स्पर्धा 39 दिवस चालणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये कतार येथे झालेल्या विश्वचषकात 64 सामने झाले होते. सहभागी संघांची संख्या वाढल्याने स्पर्धेचा आवाका आणि रोमांच दोन्ही वाढले आहेत.
48 संघांची विभागणी 12 गटांत करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार संघ असतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ थेट बाद फेरीत प्रवेश करतील. त्याशिवाय, तिसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या 12 संघांपैकी सर्वोत्तम आठ संघांनाही पुढील फेरीत स्थान मिळणार आहे. त्यामुळे गटसाखळीत अखेरच्या सामन्यापर्यंत चुरस कायम राहणार आहे.
मेक्सिकोतील ऐतिहासिक एस्टाडिओ अझ्टेका स्टेडियम 1970, 1986 आणि 2026 अशा तीन वेगवेगळ्या विश्वचषकांचे उद्घाटन सामने आयोजित करणारे जगातील पहिले स्टेडियम ठरणार आहे. कॅबो व्हर्दे, क्युरासाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे देश प्रथमच विश्वचषकात सहभागी होत आहेत.
स्पर्धेचा उद्घाटन सामना 11 जून रोजी मेक्सिकोमध्ये होणार असून, अंतिम सामना 19 जुलै रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर रंगणार आहे.
आशिया खंडातून जपान, दक्षिण कोरिया, इराण, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, कतार, उझबेकिस्तान आणि जॉर्डन यांनी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. मात्र, भारताला पुन्हा एकदा मुख्य स्पर्धेत स्थान मिळवण्यात अपयश आले.
भारताचा पात्रता फेरीत कतार, कुवेत आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत गट होता. सहा सामन्यांमध्ये भारताने एक विजय, दोन बरोबरी आणि तीन पराभव अशी कामगिरी केली. गटात अव्वल दोन स्थान मिळवता न आल्याने भारताचे फिफा 2026 चे स्वप्न अपूर्णच राहिले. फुटबॉलची वाढती लोकप्रियता असूनही भारताला अद्याप विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवता आलेला नाही, ही भारतीय चाहत्यांसाठी निराशाजनक बाब आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक
11 ते 27 जून या कालावधीत साखळी फेरीतील 72 सामने खेळवले जातील. त्यानंतर बाद फेरीला सुरुवात होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांसह तिसर्‍या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ पुढे जातील.
बाद फेरी : 28 जून ते 3 जुलै
उपांत्यपूर्व फेरी : 4 ते 7 जुलै
उपांत्य फेरी : 9 आणि 11 जुलै
तिसर्‍या स्थानाचा सामना : 18 जुलै
अंतिम सामना : 19 जुलै
विश्वचषकाच्या इतिहासाने फुटबॉलला अनेक महान खेळाडू दिले आहेत. पेले, दिएगो मॅराडोना, झिनेदिन झिदान यांनी आपल्या प्रतिभेने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आधुनिक काळात लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किलियन एम्बाप्पे आणि नेयमार यांनी फुटबॉलला नवे आकर्षण दिले आहे. फुटबॉल चाहत्यांसाठी फिफा विश्वचषक 2026 हा केवळ खेळाचा उत्सव नाही, तर भावना, परंपरा, कौशल्य आणि रोमांच यांचा जागतिक संगम आहे. जगातील
सर्वोत्तम संघ आणि तारे एकाच व्यासपीठावर आमनेसामने येणार असल्याने हा महाकुंभ अविस्मरणीय ठरणार, यात शंका नाही. हा विश्वचषकाचा प्रवास आता पुन्हा एकदा जगाला फुटबॉलच्या जादूमध्ये रंगविण्यास सज्ज
झाला आहे.

♣ तारांकित खेळाडू ♣
किलियन एम्बाप्पे (फ्रान्स)
लामिन यामाल (स्पेन)
पेद्री (स्पेन)
विनीशियस ज्युनिअर (ब्राझील)
लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
जुड बेलिंगहॅम (इंग्लंड)
एर्लिंग हालंड (नॉर्वे)
जामाल मुसियाला (जर्मनी)
अश्राफ हकिमी (मोरोक्को)

विश्वचषकाचा ऐतिहासिक प्रवास
विश्वचषकाची सुरुवात 1930 मध्ये उरुग्वेमध्ये झाली. त्यावेळी केवळ 13 देश सहभागी झाले होते. 1982 मध्ये सहभागी देशांची संख्या 24 करण्यात आली. 1998 पासून 32 संघांचा फॉरमॅट सुरू झाला आणि तो 2022 पर्यंत कायम राहिला. आता प्रथमच 48 संघ स्पर्धेत उतरले आहेत.
ब्राझील हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी देश आहे. 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002 अशा पाच वेळा ब्राझीलने विश्वविजेतेपद पटकावले आहे. जर्मनी आणि इटली यांनी प्रत्येकी चार वेळा करंडक जिंकला आहे.
अर्जेंटिनाने तीन वेळा विश्वविजेतेपद मिळवले असून, 2022 मध्ये कतार येथे झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून जेतेपद
पटकावले होते.
इंग्लंडने 1966 मध्ये तर स्पेनने 2010 मध्ये एकमेव विश्वविजेतेपद मिळवले. पोर्तुगालला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही, मात्र प्रत्येक स्पर्धेत तो धोकादायक प्रतिस्पर्धी म्हणून
ओळखला जातो.

FIFA World Cup 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *