नुकताच पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. राज्यात, देशात, विदेशात सगळीकडे वृक्षारोपण झाले. आपणही सर्वांनी वृक्षारोपण केले. आता खरी जबाबदारी आहे ती वृक्ष संवर्धनाची. एका दिवसात अनेक ठिकाणी झाडे लावली जातात, काही सरकारी नियमानुसार केले जाते, तर काही ठिकाणी उपक्रम दाखवण्यासाठी वृक्षारोपण केले जाते. एक दिवस हा वृक्षारोपणाचा साजरा केला जातो, मात्र बर्याच वेळेस त्या लावलेल्या झाडाकडे कोणी पाहायलाही येत नाही.
हे असे न घडता लावलेल्या प्रत्येक वृक्षांचे लगातार दोन वर्षे संगोपन करणे अत्यंत गरजेचे असते. ते संगोपन पर्यावरण दिनाच्या दिवशी लावलेल्या प्रत्येक झाडाचे प्रत्येकाने करावयाचे आहे. तरच पर्यावरण दिन साजरा केल्याचे खरे सुख मिळेल. कोटीच्या कोटी वृक्षारोपण कागदावर आहे, मात्र वास्तवात परिस्थिती काय आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि जाणतो आहोत. भले झाडे कमी लावा पण लावलेली झाडे जगवा. तसाही निसर्ग त्याच्या नैसर्गिक नियमाने वृक्षारोपण करतच असतो. पण विकासाच्या नावाखाली जी वृक्षतोड, जंगलतोड केली जात आहे, ती कुठेतरी रोखली गेली पाहिजे.
पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. दिखाव्यासाठी वृक्षारोपण कोणीही करू नये. मग ते शासन असू द्या किंवा सामाजिक संस्था असू द्या. जितके शक्य होईल तितके वृक्षारोपण सर्वांनाच केली पाहिजे आणि याची संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाने काळजीपूर्वक घेतली पाहिजे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर लगेच त्याला चालता येत नाही. त्याला मोठा करण्यासाठी चालायला येईपर्यंत जशी काळजी घ्यावी लागते, अगदी तशीच काळजी लावलेल्या प्रत्येक रोपट्याची घेतली
गेली पाहिजे.
पाच जून हा प्रातिनिधिक दिवस आहे. पावसाळा सुरू होण्याचा हा हंगाम आहे. पाच जूनला वृक्षारोपण सुरू करून दोन ते तीन महिने वृक्षारोपण, बीजारोपण केले गेले पाहिजे. वृक्षारोपणानंतर वेळेवर पाणी दिले गेले पाहिजे. त्यानंतर झाडांना पोषकद्रव्य सोडली पाहिजेत. संरक्षक जाळी लावून देखभाल केली पाहिजे. वृक्षारोपणाची बातमी दिली जाते तशीच संवर्धनाच्यादेखील बातम्या प्रसिद्ध केल्या पाहिजे. झाडे लावले किती आणि प्रत्यक्षात जगली किती, याचा आढावा घेतला गेला पाहिजे. वृक्षारोपणाचे शासकीय फुगलेले आकडे दिसण्यापेक्षा सगळे डोंगर, मोकळ्या जागा हिरव्यागार दिसल्या पाहिजेत.
कृती पर्यावरण रक्षणाची
खात्री उज्ज्वल भविष्याची
अशा प्रकारचे काही ब्रीदवाक्य समोर ठेवून भावी पिढीला श्वास, सावली देण्याचे काम आपल्या पिढीला करायचे आहे. भावी पिढीला संपत्ती कमवून नाही ठेवली तरी चालेल, पण भावी पिढीसाठी श्वास मात्र निर्माण करावाच लागेल. वाढलेली झाडांची संख्या तापमानाची वाढलेली संख्या कमी करू शकते. घनवन निर्मिती जितकी कराल तितके त्या भागातील तापमान कमी होईल.
वृक्षारोपणाचा एक दिवस
वृक्ष संवर्धनाचे दोन वर्षे
एवढे फक्त प्रत्येक भारतीय नागरिकाने पक्के लक्षात ठेवले त्यानुसार कृती आराखडा तयार केला गेला तर भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. वड, पिंपळ, अंबट चिंच, कडुलिंब या देशी वृक्षांची लागवड जितकी कराल तितका गारवा निर्माण होणार. हाच हवेतला गारवा निसर्गातील गोडवा निर्माण करण्याचे काम करणार, त्यातून निसर्गाशी दोस्ती होणार आणि जेव्हा निसर्ग आपला मित्र होणार, आपल्या सर्वांना सर्वांत जास्त आनंद मिळेल. त्यामुळेच निसर्गाला गुरू असे म्हटले गेले आहे. निसर्ग गुरू, निसर्ग मित्र अशा सगळ्याच भूमिका पार पाडत असतो.
प्रत्येक दिन हा साजरा करणे हा त्या कामाचे प्रातिनिधिक स्वरूप असते. तसाच हा पर्यावरण दिनदेखील हा प्रतिनिधिक दिवस असतो. एक दिवस वृक्षारोपणाचा न करता कायम वृक्षारोपण करून त्याचेच कमीत कमी दोन वर्षे वृक्षसंवर्धन करावे. चला तर मग एक पाऊल निसर्गाकडे टाकूया. वृक्षारोपण करूया, लावलेल्या वृक्षांचे संगोपन करूया.
“One day for tree planting – two years for nurturing.”