साकोरा येथे एकाच रात्री सात बंद घरे फोडली

सोने-चांदीसह लाखोंचा ऐवज लंपास

नांदगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी उच्छाद मांडत एकाच रात्री सात बंद घरे टार्गेट केली. घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी लाखोंची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक नागरिक घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत 4 ते 5 चोरट्यांनी श्रीराम मंदिरालगतच्या रोहिदास गल्लीतील देवबा ठाकरे, विजय ठाकरे, चिंधा ठाकरे तसेच राजवाडा परिसरातील व्यंकट निकम, कल्याबाई निकम आणि विजय निकम यांच्या घरांचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. तसेच हेमंत निकम यांच्या घराच्या मागची खिडकी काढून आत घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र घरातील लोक जागे असल्याने चोरट्यांनी तिथून धूम ठोकली.
देवबा ठाकरे आणि विजय ठाकरे सकाळी खाली आले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी कपाट घरात न फोडता थेट दूर शेतात नेऊन दगडाने फोडले आणि त्यातील 50 हजार रुपयांची रोकड व दागिने लंपास केले. इतर घरमालक बाहेरगावी गेलेले असल्याने, ते दुपारी परत आल्यावर त्यांच्याही घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे
उघडकीस आले.
विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वीही याच भागात एकाच रात्री सहा बंद घरे फुटली होती, ज्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने नांदगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बढे यांनी पथकासह धाव घेऊन पाहणी केली. दुपारी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपास करीत आहेत.

Seven locked houses broken into in a single night at Sakora.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *