सर्व रँकच्या सैनिकांसाठी ’ड्रेस 3 बी’ हा नवीन हिवाळी गणवेश लागू
नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय लष्कराने वसाहतवादी काळातील परंपरांना फाटा देत आपल्या गणवेशाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बदल केले आहेत. लष्कराने नुकत्याच जारी केलेल्या नव्या युनिफॉर्म कोडनुसार, सर्व रँकच्या सैनिकांसाठी ’ड्रेस 3 बी’ हा नवीन हिवाळी गणवेश लागू करण्यात आला आहे. या नव्या हिवाळी गणवेशामध्ये प्रामुख्याने अंगोला शर्ट, बॅटल जॅकेट आणि बेरेट यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करणे आणि जुन्या ब्रिटिशकालीन खुणा पुसून भारतीय अस्मितेला प्राधान्य देणे, या व्यापक उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या नियमावलीतील सर्वांत लक्षणीय बदल म्हणजे लष्करी अधिकार्यांना आता ’बंडी जॅकेट’ परिधान करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हे जॅकेट भारतीय परंपरेशी आणि संस्कृतीशी साधर्म्य सांगणारे असून, ते अधिकार्यांच्या औपचारिक पोशाखाचा एक भाग म्हणून वापरले जाऊ शकते. याशिवाय, लष्कराने काही जुन्या ब्रिटिशकालीन परंपराही संपुष्टात आणल्या आहेत, ज्यामध्ये समारंभाच्या वेळी वापरले जाणारे काही विशिष्ट बेल्ट्स आणि इतर अनावश्यक अलंकारिक वस्तूंचा वापर कमी करण्यावर किंवा ते पूर्णपणे हटवण्यावर भर देण्यात आला आहे.
गणवेशातील या महत्त्वपूर्ण बदलांसोबतच, लष्कराने सैनिकांच्या वैयक्तिक पेहराव आणि ’ग्रूमिंग’ बाबतही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये जवानांची हेअरस्टाईल, टॅटू आणि इतर शारीरिक देखाव्याबाबतचे नियम अधिक कडक आणि सुस्पष्ट करण्यात आले आहेत. महिला अधिकार्यांसाठीही पोशाखाच्या नियमांत सुसूत्रता आणली गेली आहे. एकूणच, हा नवीन युनिफॉर्म कोड भारतीय लष्कराला केवळ अधिक व्यावसायिक आणि आरामदायी बनवणारा नसून, तो लष्कराला एक खर्या अर्थाने ’भारतीय’ ओळख प्राप्त करून देणारा ठरणार आहे.
Historic change in military uniform regulations