सिडको : वार्ताहर
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणार्या संशयिताला पोलिसांनी अटक करून अपहरण केलेल्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांनी माहिती दिली की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिताकुमारी जितेंद्र भारती (25, धंदा मजुरी, रा. बिल्डिंग नंबर 6, पाचवा मजला, घर नंबर 511, चुंचाळे शिवार घरकुल, अंबड, नाशिक) या कामावर गेल्या असताना त्यांची मुलगी सुमिया जितेंद्र भारती (वय 1 वर्षे 6 महिने) हिचे (दि.29) संध्याकाळी 6 वाजेपूर्वी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावरून अपहृत मुलीचा तपास करत असताना सपोनी गणेश शिंदे, पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुलीचे अपहरण एका व्यक्तीने केले असल्याचे त्यांना समजले. यावरून वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार,
पोलीस अंमलदार हेमंत आहेर, दिनेश नेहे, जितेंद्र वजिरे, सम्राट मते, सुवर्णा सहाणे यांच्या पथकाने सापळा रचत संशयिताला अटक केली व त्याने ज्या ठिकाणी दीड वर्षाच्या मुलीला ठेवले होते तेथून पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. संशयिताने दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यामागे नेमके कारण काय व त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत.