पंढरपूर सप्ताह समितीचे स्तुत्य पाऊल

सप्ताहातील 72 लाखांची देणगी संत संस्थानांसह गोशाळांना

सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथील 65 एकर क्षेत्रावर 17 ते 24 मे दरम्यान अधिक मास तसेच विविध संतांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. या वैष्णवकुंभासाठी राज्यातील कानाकोपर्‍यांतील वारकर्‍यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविकांनीही उपस्थिती लावली होती. दरम्यान, या सप्ताहातील शिल्लक 72 लाखांची रक्कम राज्यातील विविध 19 संत संस्थाने व आठ गोशाळांना देणगी स्वरूपात देण्यात आली, अशी माहिती समस्त सोलापूर जिल्हा सप्ताह समिती व समितीप्रमुख तुकाराम पाटील माळेगावकर यांनी दिली.

पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्वकाळात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त, संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्या 675 व्या समाधी सोहळ्यानिमित्त तसेच संत सावता महाराजांच्या 775 व्या जन्मोत्सवानिमित्त हा सप्ताह सोहळा आयोजित करण्यात या सोहळ्यासाठी एकूण एक कोटी 74 लाख 91 हजार 188 रुपये देणग्यांच्या स्वरूपात जमा झाले होते. त्यांपैकी सप्ताह आयोजनासाठी एक कोटी 2 लाख 90 हजार 188 रुपये खर्च झाले. उर्वरित 72 लाख एक हजार रुपयांची संपूर्ण रक्कम विविध संत संस्थाने आणि गोशाळांना देणगी म्हणून देण्यात आली आहे.
दरम्यान, सप्ताह समितीच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. सप्ताह समितीने व्यवहाराची पारदर्शकता जपत राज्यभरात सर्वासमोर आदर्श घालून दिला आहे.

सप्ताहातील सर्व शिल्लक रक्कम राज्यातील विविध संतांच्या संस्थानांना व गोशाळांना देण्यात आलेली आहे. यासह उत्सवात भाविकांनी दर्शनानंतर आपल्याला दिलेले 55 हजार 790 रुपये तिथेच जमा केले. आपण सप्ताहासाठी स्वखर्चाने आलो व स्वखर्चानेच परतलो.
– ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कदम, आयोजक

प्रमुख संत संस्थाने व गोशाळांना दिलेल्या देणग्या

श्रीगुरू जोग महाराज वारकरी शिक्षणसंस्था (आळंदी) 11 लाख रुपये, श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर) 10 लाख रुपये, श्री संत सोपानदेव समाधी ट्रस्ट (सासवड) 5 लाख रुपये, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान (मेहुण) 3 लाख रुपये, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर) 5 लाख रुपये, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (नेवासा) 5 लाख रुपये, श्री संत निळोबाराय देवस्थान ट्रस्ट (पिंपळनेर) 2 लाख 51 हजार रुपये, श्री संत दामाजी संस्थान (मंगळवेढा) 1 लाख रुपये, श्री संत सावतेबुवा देवस्थान ट्रस्ट (अरण) 50 हजार रुपये, श्री संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट (अरण) 50 हजार रुपये, श्री संत कुर्मदास संस्थान (लऊळ) 50 हजार रुपये, श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना (पंढरपूर) 2 लाख रुपये, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती (पंढरपूर) 5 लाख रुपये, श्री संत महिपती महाराज देवस्थान (ताहाराबाद) 2 लाख 50 हजार रुपये, श्री जोग महाराज भजनी मठ (इगतपुरी) 3 लाख रुपये, श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान (नीरा नरसिंहपूर) एक लाख रुपये, श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ (पैठण) 5 लाख रुपये, श्रीगुरू विठ्ठल बाबा चौधरी स्मारक (अमळनेर) 1 लाख रुपये, श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था 50 हजार रुपये, सूरधेनु सेवाभाव बहुउद्देशीय संस्था (मनमाड) 50 हजार रुपये, समर्पण गोशाळा (तरवाडे, जळगाव) 50 हजार रुपये, राधाकृष्ण गोशाळा (वांबोरी) 1 लाख रुपये, माउली कृपा गो संस्थान (पारनेर) 1 लाख रुपये, निळकंठेश्वर गोरक्षण (लातूर) 1 लाख रुपये, श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा (दौंड) 2 लाख 50 हजार रुपये. याप्रमाणे संस्थाने व गोशाळांचा यात समावेश आहे.

A praiseworthy step by the Pandharpur Saptah Committee

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *