नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला आहे. नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. नाशिक व सिन्नर तालुक्यांतील 34 गावांमधील जमीन अधिग्रहित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. हा प्रकल्प धार्मिक, औद्योगिक आणि कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण
ठरणार आहे.
कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमध्ये येणार्या कोट्यवधी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. शिर्डी हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने नाशिक-शिर्डी रेल्वेजोडणी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. निफाड उपविभागीय अधिकार्यांकडे सक्षम प्राधिकरण म्हणून जबाबदारी सोपवण्यात
आली आहे.
या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील 23 आणि नाशिक तालुक्यातील 11 गावांमध्ये जमीन संपादित केली जाणार आहे. सिन्नर, खंबाळे, कुंदेवाडी, वावी, पाटपिंप्री, भोकणी, सुंदरपूर यांसह अनेक गावांचा समावेश आहे. जाखोरी, देवळाली, विहितगाव, संसरी, पंचक आणि चाडेगाव या गावांतही भूसंपादन होणार आहे.
या रेल्वेमार्गामुळे शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या धार्मिक स्थळांमधील संपर्क अधिक सुलभ होईल. सिन्नर एमआयडीसीतील उद्योगांना, तसेच कांदा, द्राक्षे, डाळिंब उत्पादक शेतकर्यांना वाहतुकीसाठी नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. पर्यटन व रोजगार निर्मितीलाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचे
मानले जाते.
34 गावांत होणार भूसंपादन
सिन्नर तालुका (23 गावे) :
सिन्नर, बारागावपिंप्री, सुंदरपूर, पाटपिंप्री, ब्राह्मणवाडे, देशवंडी, जायगाव, खंबाळे, कुंदेवाडी, वडझिरे, दातली, मलढोण, पाथरे खुर्द, पांगरी खुर्द, फुलेनगर, मुसळगाव, पांगरी बुद्रुक, वावी, सायाळे, भोकणी आदी.
नाशिक तालुका (11 गावे) :
जाखोरी, देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, चेहेडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव.
प्रकल्पाचे अपेक्षित फायदे
♦ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सक्षम रेल्वे वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार.
♦ नाशिक-शिर्डी-त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडॉर अधिक मजबूत होणार.
♦ सिन्नर एमआयडीसी व औद्योगिक क्षेत्राला मालवाहतुकीसाठी नवा पर्याय मिळणार.
♦ कांदा, द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
♦ पर्यटन व्यवसायाला चालना मिळून पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार.
♦ रेल्वे प्रकल्प व पूरक सेवांमधून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
Land acquisition process begins in 34 villages for the Nashik-Shirdi double railway line.