येवला : प्रतिनिधी
येवला-नाशिक महामार्गावरील एरंडगाव शिवारात क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, येवला तालुका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
केला आहे.
23 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एरंडगाव शिवारातील वर्मा लॉन्ससमोर हा अपघात घडला. धुळे येथील प्रवीण शांताराम डुकरे हे आपल्या कुटुंबासह दुचाकीने (एमएच 15 जीडी 6888) येवल्याकडून एरंडगावच्या दिशेने जात होते. याच वेळी नाशिकच्या दिशेने जाणार्या क्रेटा कारने (एमएच 15 एचसी 7170) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, हेमा प्रवीण डुकरे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर प्रवीण शांताराम डुकरे, आदेश प्रवीण डुकरे आणि संस्कृती प्रवीण डुकरे (वय 9) हे तिघे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान नऊ वर्षांची संस्कृती डुकरे हिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी धीरज राजेंद्र पाटील (रा. एरंडगाव, ता. येवला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर करत आहेत.
Mother and daughter killed after being hit by a Creta car near Erandgaon.