सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील वावी वेस परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, स्ट्रीट लाइट बंद पडल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील 8 पैकी केवळ 3 स्ट्रीट लाइट सुरू होत्या. मात्र, आज त्यादेखील पूर्णपणे बंद झाल्याने संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. वावी वेस भागातून जाणार्या मुख्य रस्त्यावर दिवसरात्र भरधाव वेगाने वाहने धावत असतात. अशा परिस्थितीत रस्ता ओलांडताना नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना अंधारामुळे जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. दरम्यान, अग्निशामक केंद्रासमोरील गटारावर झाकण (ढापा) नसल्यामुळे नुकतीच एक महिला त्या गटारात पडून गंभीर जखमी झाली. अंधारामुळे गटाराचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच परिसरात आणखी एक गंभीर समस्या म्हणजे कचर्याचा मोठा ढिगारा. अग्निशामक इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेचे कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करणे, उघड्या गटारावर सुरक्षित झाकण बसविणे आणि परिसरातील कचरा त्वरित हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Wavi Ves area plunged into darkness; streetlights off, woman seriously injured after falling into an open drain.