खाऊगल्लीतील अस्वच्छतेकडे ‘एफडीए’चा कानाडोळा
♦ काळ्या कुळकुळीत तेलात तळतात पदार्थ
♦ हातगाड्यांवरील पदार्थांचा दर्जा तपासावा
नाशिक : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त, अस्वच्छ अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणार्या हॉटेल, उपाहारगृहे तसेच खाद्य व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मोहिमेचे स्वागत होत असले तरी कारवाई केवळ हॉटेल व्यावसायिकांपुरती मर्यादित न राहता शहर आणि उपनगरांतील हातगाड्या, घरगुती मेस, खानावळी, ऑनलाइन फूड सप्लाय चेन आणि इतर खाद्य विक्रेत्यांपर्यंत पोहोचणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हॉटेल व्यवसायावर लागू करण्यात आलेले कडक नियम, विशेषतः खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळण्याबाबतची अट, यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या मोहिमेचे स्वागत केले असून, अन्नातील भेसळ रोखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील विविध नियमांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यास बंदी आणि अन्न तयार करताना स्वच्छतेचे निकष पाळण्यावर भर देण्यात आला. मात्र, नाशिक शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याची चर्चा आहे. अस्वच्छ परिस्थितीत तयार होणारे पदार्थ, विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीचे प्रकार यावर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केल्याने काही व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार गरम केल्याने त्यामध्ये शरीरासाठी हानिकारक रासायनिक घटक तयार होतात. अशा तेलाचा नियमित वापर केल्यास हृदयविकार, मधुमेह, पचनाचे विकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घरात तसेच हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ताजे तेल वापरण्यावर भर द्यावा. नागरिकांनीही तळलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवून संतुलित आहार स्वीकारणे गरजेचे आहे.
– क्षितिजा गायकवाड, आहारतज्ज्ञ
Hotels under scrutiny; street food left unchecked.