नागरिकांच्या तक्रारींवर जागेवरच उपाय
सिडको : विशेष प्रतिनिधी
मान्सून काळात नागरिकांना नागरी समस्यांचा त्रास होऊ नये आणि तक्रारींवर त्वरित कार्यवाही व्हावी, या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेने 26 जूनपासून मान्सून टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये संयुक्त पाहणी करून नागरिकांच्या विविध तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि प्रदीप चौधरी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त नितीन नेर, सुवर्णा दखणे तसेच कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांनी पाहणीत सहभाग घेतला.
पाहणीदरम्यान नवीन नाशिक प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाठ, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे तसेच नगरसेवक बंटी तिदमे, नगरसेविका डॉ. पूनम महाले आणि पल्लवी गणोरे यांनी परिसरातील विविध नागरी समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही केली.
या मोहिमेत ड्रेनेज चेंबरची साफसफाई, ब्लॅक स्पॉटवरील कचरा उचलणे, अतिक्रमण हटविणे, आवश्यक नागरी दुरुस्ती, इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 व 2 येथील प्रलंबित समस्यांचे निराकरण तसेच छत्रपती शिवाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक शौचालय, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत प्राप्त तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
‘प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत महापालिका प्रशासनाचे आभार मानले. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 26 जून ते 19 जुलै या कालावधीत नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 24, 25, 27, 28, 29 आणि 31 मध्ये मान्सून टास्क फोर्सची विशेष मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील नागरी समस्या संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देऊन या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने
केले आहे.
Monsoon Task Force’s intensive drive in Ward 24