शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तत्पर उपाययोजना गरजेच्या

गटविकास अधिकारी भवारी : पंचायत समितीत कृषी दिन कार्यक्रम

सिन्नर : प्रतिनिधी
नुकसानभरपाई, सिंचन आणि बाजारपेठ यांसारख्या प्रश्नांमध्ये होणारा विलंब शेतकर्‍यांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे शेतकरी हिताच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अशोक भवारी
यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि सिन्नर पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.1) पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी आणि कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना भवारी बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब देठे, रणजीत आंधळे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय ढवळे, कृषी विस्तार अधिकारी संजय गोसावी, मच्छिंद्र कांगणे, पत्रकार भरत घोटेकर, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कानडी उपस्थित होते.
यावेळी भवारी यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याची गरज अधोरेखित केली. प्रशासनाची ओळख केवळ फायलीपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी असावी. अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. समाजात संवेदनशीलता आणि जागृती निर्माण करून शेतकरी प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बदलत्या हवामानाचा आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करून शेतकर्‍यांनी पीकपद्धतीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. नियोजनबद्ध शेती आणि बाजारपेठाभिमुख उत्पादनामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकवलेल्या मालाची किंमत ठरवताना अनेकदा घासाघीस केली जाते; मात्र इतर ठिकाणी खर्च करताना त्याच पैशांचा विचार केला जात नाही. ही मानसिकता बदलण्याची गरज असून, शेतकर्‍यांच्या कष्टाला योग्य सन्मान आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी मच्छिंद्र कांगणे यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब देठे यांनी आभार मानले.

Prompt measures are needed to address farmers’ issues.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *