सारोळे खुर्दमधील शेतकर्यांमध्ये तीव्र संताप
निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे महापारेषण व महावितरणच्या वीजवाहिनी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर उंच टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, या कामामुळे अनेक अल्पभूधारक शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यालगतच्या सुपीक आणि भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार्या शेतजमिनींवर टॉवर उभारले जात असल्याचा आरोप बाधित शेतकर्यांनी केला आहे.
बाधित शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदार व काही अधिकारी शेतकर्यांची संमती न घेता अथवा त्यांच्याशी सविस्तर चर्चा न करता टॉवरचे नियोजन करत आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी शासकीय पडीक जमीन उपलब्ध असतानाही खासगी शेतकर्यांच्या जमिनींची निवड करण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
शेतकर्यांचे म्हणणे आहे की, रस्त्यालगतची जमीन भविष्यात गोदाम, कृषी सेवा केंद्र, प्रक्रिया उद्योग किंवा अन्य पूरक व्यवसाय उभारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मात्र, अशा ठिकाणी विजेचे टॉवर उभारल्यास त्या जमिनीचा व्यावसायिक विकास कायमस्वरूपी खुंटतो. त्यामुळे भविष्यातील उत्पन्नाच्या संधी हिरावल्या
जात असून, अल्पभूधारक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, अशा प्रकारचे नियोजन त्याच्या अडचणीत आणखी भर घालत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या पातळीवरही शेतकर्यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार संवाद साधण्याऐवजी कायद्याची भाषा वापरून दबाव आणत असल्याचाही दावा काही बाधित शेतकर्यांनी केला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा प्रशासन, महापारेषण, महावितरण तसेच लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात आणि शेतकर्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण निफाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Mahatransco towers on fertile land
शेतकर्यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप