रिलायन्सच्या ’स्ट्रँड लाइफ सायन्सेस’ची ऐतिहासिक झेप; एआय तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट
मुंबई : प्रतिनिधी
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वैद्यकीय क्षेत्रातील उपकंपनीने कर्करोगासारख्या (कॅन्सर) गंभीर आजाराच्या निदानात एक मोठी आणि ऐतिहासिक झेप घेतली आहे. रिलायन्सच्या मालकीच्या ’स्ट्रँड लाईफ सायन्सेस’ या कंपनीने विकसित केलेल्या रक्ताच्या तपासणीतून (ब्लड टेस्ट) कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेतच अचूक निदान करणार्या तंत्रज्ञानाला नुकतेच भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर वेळेत आणि अधिक प्रभावीपणे उपचार करण्याचा मार्ग आता सोपा होणार आहे.
हे नवीन तंत्रज्ञान अत्याधुनिक ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर (एआय-कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित आहे. सामान्यतः कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी बायोप्सीसारख्या गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ चाचण्यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र,
रिलायन्सच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे केवळ रक्ताच्या एका साध्या चाचणीद्वारे (लिक्वीड बायोप्सी) शरीरातील कर्करोगाच्या पेशी किंवा डीएनएमधील बदल अगदी सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णांना विनाकारण होणारा त्रास टळेल आणि निदानाची प्रक्रिया अत्यंत सुलभ, वेदनारहित आणि जलद होईल.हे भारतीय पेटंट मिळणे, हे रिलायन्स समूहाच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढत्या वर्चस्वाचे आणि संशोधनातील प्रभावी गुंतवणुकीचे मोठे फळ मानले जात आहे. ’मेक इन इंडिया’ अंतर्गत विकसित झालेले हे प्रगत स्वदेशी तंत्रज्ञान भारताला जागतिक वैद्यकीय संशोधन नकाशावर आणखी भक्कमपणे प्रस्थापित करत आहे.
कॅन्सर रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कर्करोगावरील उपचारात सर्वांत मोठे आव्हान हे त्याचे उशिरा होणारे निदान, हेच असते. बहुतांश वेळा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावर त्याचे निदान होते, ज्यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे कठीण जाते. ’स्ट्रँड लाइफ सायन्सेस’च्या या एआय-आधारित तंत्रज्ञानामुळे कॅन्सरची चाहूल पहिल्या किंवा दुसर्या टप्प्यातच लागू शकेल. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल. भारतीय रुग्णांसाठी हे एक मोठे वरदान ठरणार असून, यामुळे उपचारांचा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे.