शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

मुख्यमंत्र्यांची घोषणा; 50 हजार मर्यादेची अट काढली

मुंबई : प्रतिनिधी
याआधीच्या महात्मा जोेतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांनाही यावेळी दोन लाखांच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 10) विधानसभेत केली. याशिवाय प्रोत्साहनपर अनुदानासाठी असलेली 2026-27 चे पीककर्ज भरण्याचा नियमही वगळण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी गेले काही दिवस सातत्याने केली जात होती. त्यातच महायुतीच्या विदर्भातील आमदारांनी भेट घेऊन पन्नास हजारांची अट काढून टाकण्याची मागणी केली, असे फडणवीस म्हणाले.
आपण त्यांना आर्थिक शिस्त, बँकिंग सिस्टिम याबाबत सांगतो होतो. मात्र, काहींना लाभ आणि काहींना नाही, यातून अन्यायाची भावना होईल, असा व्यापक विचार आमदारांनी आग्रहीपणे मांडला. यामुळे अतिरिक्त तीन-चार हजार कोटींचा भुर्दंड येईल, पण लोकशाहीत अनेकदा शिस्तीपेक्षा लोकभावना आणि बहुमताचा मान राखणे आवश्यक असते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही कोणत्याही अटी-शर्तींशिवाय आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी योजना असल्याचे फडणवीस यांनी अभिमानाने नमूद केले.
कर्जमाफीच्या निर्णयासाठी आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. कोणतीही निवडणूक बाकी नाही, पण आम्ही थांबलो नाही. शेतकरी अडचणीत असेल तर त्याला तत्काळ कर्जमाफी द्यायला हवी, असा विचार करून आम्ही निवडणुका नसताना कर्जमाफीचा निर्णय घेतला. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांना यावेळी 50 हजारांंपर्यंतच लाभ मिळणार होता. प्रोत्साहनपर अनुदान मिळणार्‍यांना 2026-27 चे पीककर्ज भरण्याची अटही आधी घालण्यात आली होती. आता दोन्ही अटी काढून टाकल्या आहेत. अशा शेतकर्‍यांनाही आता दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. अशा लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या दोन ते तीन लाखांच्या घरात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

फडणवीस यांचे राज ठाकरेंना चिमटे

मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता चिमटे काढले. फडणवीसांनी राज यांचा चांगलाच समाचार घेतला. हिंदीत ’भाडे के टट्टू’ म्हटल्याने काही जणांना झोंबले, ते हिंदीतील शब्द मी मागे घेतो. त्यांना शुद्ध मराठी भाषेत सुपारीबाज म्हणायला हवे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री म्हणाले की, मिसिंग लिंकवरील भाषणाने काही जणांना उगीचच मिरची लागली. खरेतर मी काही सुपारीबाजांना बोललो होतो. मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली ते कळलेच नाही. आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की मी हिंदीत बोललो. ते जर मिमिक्री आर्टिस्ट झाले असते तर सर्व स्टँड अप कॉमेडियनची दुकाने बंद झाली असती. तसे ते आमचे मित्र आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांचा काही धोका नाही. ते अधूनमधून असे काहीतरी करत असतात. यावेळी मिसिंग लिंकला कोणतेही नुकसान झालेले नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. एकाही टनेलला तडा गेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loan waiver of up to two lakh rupees for farmers.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *