‘ऑपरेशन टायगर’ला एकसंघपणानेे प्रत्युत्तर

– गोरख काळे

महापालिका निवडणूक होऊन सहा महिने होत नाही तोच ठाकरे सेनेचे दहा ते बारा नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चा समोर येताच नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिंदेसेनेने ऑपरेशन टायगरअंतर्गत गेल्याच महिन्यात सहा खासदार फोडून शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिला. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र त्यांना दाखविलेली आमिषे धुडकावत ते ठाकरेंसमवेत ठाम राहिले. त्यांच्या या निष्ठेचे नाशिकच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात कौतुक झाले. त्यानंतर आता याच नाशिकमधील नगरसेवक गळाला लावण्यासाठी शिंदेसेनेने डाव टाकण्यास सुरवात केल्याची चर्चा आहे; परंतु आम्ही सर्व नगरसेवक निष्ठावान व एकसंघ असल्याचे ठाकरेंचे गटनेते केशव पोरजे यांनी सांगत शिंदेसेनेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. सध्यातरी शिंदेसेनेचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, हे त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला.

नगरसेवक फुटणार असल्याचे समोर येताच ठाकरेंनी याची गंभीर दखल घेत व आता कुठलाही धोका नको म्हणून त्यांनी तत्काळ संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांना नाशकात धाडले. शिंदेसेना गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंना एकामागोमाग धक्के देत आहे. ठाकरेंच्या संघटनावरच शिंदेंना घाव घालायचा आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत पक्षाला कुमकवत करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातून मेगा आउटगोईंगला सुरवात झाली. त्याला कारण म्हणजे, पश्चिम व मध्य विधानसभा या दोन्ही मतदारसंघांत झालेला पराभव होय. सध्या ठाकरेंकडे माजी आमदार वसंत गिते वगळता अनेकांनी शिंदेसेना, भाजपची वाट धरली. यात सुधाकर बडगुजर भाजपवासी झाले, तर विलास शिंदेंसह प्रभागातील नगरसेवकांनी शिंदेसेनेची वाट धरली. त्यापूर्वी माजी खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते या नेत्यांसह नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. 2017 मध्ये निवडून आलेल्या 35 नगरसेवकांपैकी ठाकरे सेनेत अखेरपर्यंत अवघे चार ते पाच इतकेच नगरसेवक सोबत राहिले. त्यामुळे ठाकरे गटाची नाशिकमधील काय स्थिती असेल, हे लक्षात येते. जानेवारीत झालेल्या निवडणुकीत पक्षाचे पंधरा नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे, पक्षसंघटनेतील बर्‍यापैकी पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी पक्षाची संकटात साथ सोडत आपल्या सोयीसाठी पक्षांतर केले. त्या परिस्थितीतही ठाकरे सेनेचे 15 नगरसेवक निवडून आले अन् त्यांनी भाजप-शिंदेसेनेला जोरदार धक्का दिला. राजकीय स्थिती पाहता ठाकरेंचे किती नगरसेवक निवडून येतील यावर मोठी साशंकता व्यक्त केली जात होती. ठाकरेंचे निवडून आलेले पंधरा नगरसेवक हा शिंदेसेनेसाठी मोठा धक्का होता. कारण शिंदेसेनेला पक्षाच्या मानाने अगदी 26 जागांवर समाधान मानावे लागले. सत्तेत असूनही व निवडणुकीच्या तोंडावर पक्षात मोठी इनकमिंग होऊनही महापालिकेतील हे यश खूपच मर्यादित राहिले. अपेक्षित जागा न मिळाल्याने वरिष्ठांनी स्थानिक पदाधिकार्‍यांची कानउघाडणीही केल्याचे तेव्हा बोलले गेले. भविष्यात शहरातील संघटन प्रभावी करण्यासाठी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांकडे शिंदेसेनेने मोर्चा वळवल्याचे दिसते. याकरिता कोणी एजंट नगरसेवकांशी काही दिवसांपासून संपर्क साधत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही नगरसेवकांची शिंदेसेनेच्या वरिष्ठांशी भेटही झाल्याचे बोलले जात आहे. ठाकरेंचे नगरसेवक फोडून शिंदेसेनेतील एकाला उपमहापौर बनायचे असल्याचा धक्कादायक आरोप पोरजे यांनी केला आहे. यावरूनच आता शिंदेसेनेतील तो नगरसेवक कोण? यावरून पक्षांतर्गत संभ्रम होत आहे. मात्र, शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी ठाकरे गटाचे आरोप खोडून काढत आम्हाला कोणालाही फोडण्याची गरज नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कामे करण्यासाठी अनेक जण स्वखुशीने पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले. महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिंदेसेनेत उपमहापौर पदावरून कमालीचे नाराजीनाट्य रंगले होते. महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. स्थायी, गटनेते व उपमहापौरपदी डावलल्याची खदखद उघडपणे बोलून दाखवली होती. नंतर याप्रकरणी खुद्द शिंदे यांनी पक्षातील अंतर्गत वादावरून चांगलीच कानउघाडणी करत या प्रकरणावर पडदा टाकला. यानंतर मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा धक्कादायक पराभव झाल्याने तो एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागला आहे. पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असून, त्याद़ृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. आमदार गोकुळ गिते यांना विजयी होताच त्यांनी सहयोगी सदस्य करून घेतले.
या पराभवाचे शल्य बाजूला ठेवत ठाकरे सेनेचे नगरसेवक गळाला लावण्यासाठी पुन्हा शिंदेसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनीच याबाबत सांगत नाशिकच नव्हे, तर राज्यातील विविध भागांतील नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याचा दावा माध्यमांसमोर केला. नाशिकमध्ये सध्यातरी ठाकरे सेनेचे नगरसेवक पक्षासोबत आहेत. मात्र, पक्षाचे गटनेते केशव पोरजे शुक्रवारी (दि.10) म्हणाले, की जो कोणी नगरसेवक पक्षाला सोडून जाईल, त्याला प्रभागातील मतदार तुडवतील. शिवाय ते अपात्रही होतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या बोलण्याचा अर्थ काय? अशी चर्चा होते आहे. काही नगरसेवक खरंच शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत असल्यानेच त्यांनी हे विधान केले तर नाही ना? अशीही चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

निधीची अडवणूक

महापालिकेतील भाजप-शिंदेसेनेच्या नगरसेवकांच्या तुलनेत ठाकरे सेनेच्या नगरसेवकांवर निधी देण्यात अन्याय केला जात आहे. याद्वारे नगरसेवकांंची कोंडी करून ते पक्षांतर करतील, अशी अनैसर्गिक भावना सत्ताधारी पक्षाची असल्याचा आरोप ठाकरेसेनेने केला आहे. म्हणून ठाकरेंच्या सर्वच नगरसेवकांना निधी देण्यात आखडता हात घेतला जातो आहे. याबाबत आयुक्तांना नुकतेच निवेदन देण्यात आले. सत्ताधारी सदस्यांप्रमाणे ठाकरे सेनेलाही विकासनिधी देण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली.

फोडाफोडीत व्यस्त, शहराकडे दुर्लक्ष

शहरात दोन दिवस झालेल्या पावसाने प्रशासनाच्या कामांचा पंचनामा केला. प्रशासन कामांत किती मागे आहे, हे जणू पावसाने दाखवून दिले. संपूर्ण शहरात रस्ते खोदून ठेवल्याने शेकडो वाहने पावसाच्या पाण्यात अडखळत होती, काही ठिकाणी अपघातही झाले. शहराची अशी वाताहत झालेली असताना दुसरीकडे पक्षांना दुसर्‍यांचे आमदार, खासदार, नगरसेवक फोडण्यातच रस आहे. शहरात गंभीर बनलेल्या समस्यांकडे त्यांना लक्ष देण्यात वेळ नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. नागरिकदेखील रस्ते परिस्थितीवरून महापालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांवर संताप व्यक्त करत आहेत.

A united response to ‘Operation Tiger’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *