कारच्या काचा फोडत मारहाण, लूटमार; गुन्हा दाखल
नाशिक : प्रतिनिधी
इगतपुरीजवळील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकच्या एका कुटुंबाचा पाठलाग करून सहा ते सात अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना 12 जुलै रोजी घडली आहे. हल्लेखोरांनी महिलेचा विनयभंग करत मोबाइल आणि सोन्याची साखळी लुटली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध गंभीर कलमांंतर्गत झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पुढील तपासासाठी इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
नाशिकरोड येथील पूनम किरण भागवत (वय 44) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी (12 जुलै) पूनम, त्यांचे पती किरण भागवत, मुले, दीर सागर भागवत आणि जाऊ कोमल भागवत हे सर्वजण त्यांच्या टाटा सफारी (एमएच 15- क्यू 1337) कारने इगतपुरीतील भावली धरण येथे पर्यटनासाठी गेले होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास धरणाजवळील धबधब्याकडे पाहत असताना 20 ते 25 वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी पूनम यांच्याकडे बघून शिट्या वाजवल्या. त्यांच्या पतीने विरोध केला असता तिथे उपस्थित असलेल्या सात-आठ स्थानिक तरुणांनी त्यांच्या पतीशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून हे कुटुंब नाशिककडे जाण्यासाठी निघाले. मात्र, सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर एका पांढर्या रंगाच्या मारुती बलेनो कारने (एमएच 46- बीई 3721) त्यांच्या कारचा पाठलाग करून गाडी आडवी लावली. बांबू, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉड घेऊन उतरलेल्या सहा-सात जणांनी टाटा सफारीच्या काचा फोडल्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरूनही (एमएच 15-के4502) काही तरुण आले होते. हल्लेेखोरांनी कारची काच फोडून विनयभंग केला व त्यांच्या हातातील सॅमसंग एस 24 अल्ट्रा मोबाइल हिसकावून घेतला. पती किरण यांना शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावली.
एका हल्लेखोराने पतीच्या डोक्यात बेसबॉल स्टिकने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तो वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. या कुटुंबाने कसेबसे तेथून पळ काढत थेट नाशिकचे अंबड पोलीस ठाणे गाठले. तिथे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. घटनास्थळ इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी इगतपुरी (नाशिक ग्रामीण) पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
Family visiting Bhavli Dam attacked