– शिल्पा पंडित
मुलींना घराबाहेर पाठवायलाही आज आई घाबरते. माणुसकी दिवसेंदिवस संपत चालली आहे… माणूस इतका क्रूर कसा झाला? हे लिहिताना माझं मन खूप व्यथित झालं आहे आणि हात थरथरत आहेत. गेल्याच आठवड्यात पुण्यात माझ्या भाचीसोबत एक धक्कादायक घटना घडली. ती शाळेच्या बसकडे चालली असताना एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग सुरू केला. सुदैवाने ती आणि तिची मैत्रीण धावत लोकांमध्ये गेल्या, आरडाओरडा केला आणि बचावल्या. पण त्या दिवसापासून माझ्या डोळ्याला नीट झोपच लागलेली नाही.
कारण रोजच एखादी नवीन बातमी समोर येते. सहा वर्षांची चिमुकली ट्युशनला जाऊन बेपत्ता होते. कॉलेजला गेलेली मुलगी घरी परतत नाही. कामावर गेलेली महिला गायब होते. आणि काही दिवसांनी… तिचा मृतदेह सापडल्याची बातमी येते. आज आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का? ना शाळेच्या रस्त्यावर… ना कॉलेजमध्ये… ना घराजवळ भाजी आणायला जातानाही…ही भीती खरी आहे. आई म्हणून माझ्या मुलीने घराबाहेर पाऊल टाकलं की माझा जीव टांगणीला लागतो. दर पाच मिनिटांनी फोन पाहते… पोहोचलीस ना?, कुठे आहेस?, बसमध्ये बसल्यावर फोन कर.
आपण मुलांना शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी बाहेर पाठवतो. पण आज ती सुखरूप घरी परततील की नाही, याचीच भीती वाटते. माणसं इतकी अमानुष का होत चालली आहेत? याचं उत्तर माझ्याकडे नाही. क्रौर्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जेव्हा एखाद्या चिमुकलीचं निरागस बालपण, विद्यार्थिनीची स्वप्नं आणि स्त्रीचा सन्मान यांना काहीच किंमत राहत नाही, तेव्हा आपण नेमक्या कोणत्या समाजात जगतो आहोत? सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षणी कुठेतरी एखादी मुलगी बेपत्ता होत आहे. आई-वडील पोलीस ठाण्याच्या पायर्या झिजवत आहेत, टीव्हीवर रडत आहेत, पोस्टर्स लावत आहेत… आणि अनेकदा खूप उशीर झालेला असतो. सरकार कायदे करते, हेल्पलाइन सुरू करते, आश्वासने देते. पण प्रत्यक्षात भीतीच जिंकताना दिसते. गुन्ह्यांचा तपास आणि न्याय मिळायला विलंब होतो. रस्ते अजूनही सुरक्षित वाटत नाहीत.
मग पालक म्हणून आपण सावध नक्की राहू शकतो. कारण आपल्या मुलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी अखेरीस आपलीच आहे. शाळा आणि महाविद्यालयीन मुलींसाठी शक्यतो पडताळणी केलेल्या वाहनांचाच वापर करा. चालक, वाहतूकदार यांची माहिती पालकांकडे असू द्या. मुलींनी शक्यतो एकटं प्रवास करू नये. दोन किंवा अधिक जणींनी एकत्र जाण्याची सवय लावा. स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या. अडचण आल्यास मोठ्याने ओरडणे, लोकांची मदत मागणे आणि त्वरित पालक व शिक्षकांना सांगणे शिकवा. कुटुंबाचा एक गुप्त ’कोड वर्ड’ ठरवा. दुसरी व्यक्ती घ्यायला आली तर तो कोड विचारण्याची सवय लावा. शक्य असल्यास लाइव्ह लोकेशन शेअर करा आणि पोहोचल्यावर एक फोन किंवा संदेश करण्याची सवय ठेवा.
कामावर जाणार्या महिलांसाठी- कॅब किंवा वाहनाची माहिती कुटुंबीयांशी शेअर करा. शक्यतो निर्जन रस्ते आणि उशिराचा एकट्याने प्रवास टाळा. आपत्कालीन क्रमांक फोनमध्ये सेव्ह ठेवा : 112- राष्ट्रीय आपत्कालीन सेवा, 1091- महिला हेल्पलाईन, 1098- चाईल्ड हेल्पलाइन.
आपल्या मनाला काहीतरी चुकीचं वाटत असेल तर त्या ठिकाणाहून त्वरित दूर व्हा आणि मदत मागा.
पोलीस प्रशासनाकडे: शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेत नियमित गस्त, तक्रारींची तातडीने नोंद आणि जलद कारवाई. समाजाकडे: एखादं मूल किंवा महिला अडचणीत दिसली तर थांबा, मदत करा आणि आवश्यक असल्यास पोलिसांना कळवा. प्रत्येक आईसाठी… तुमची काळजी मला समजते. मुलगी सुखरूप घरी येईपर्यंत घशात अडकलेला तो जीव मला समजतो. प्रत्येक वाईट बातमीसोबत वाढणारी भीतीही मला समजते.
आपण आपल्या मुलींशी, मुलांशी, शेजार्यांशी आणि शाळांशी या विषयावर मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपल्याला असं जग हवं आहे, जिथे प्रत्येक मुलगी शाळेत, कॉलेजमध्ये, कामावर जाईल आणि सुरक्षितपणे घरी परतेल.चला, आवाज उठवूया. सजग मुलं घडवूया. संवेदनशील आणि जबाबदार पुरुष घडवूया. जोपर्यंत जग बदलत नाही, तोपर्यंत एकमेकांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पार पाडली पाहिजे. आजचा सर्वात मोठा प्रश्न एकच आहे – आपल्या मुली आणि महिला खरोखर सुरक्षित आहेत का?
Where exactly is the world heading?