सावळ घाटात अपघात; चार जण ठार

दोन ट्रकमध्ये चिरडल्याने इको कारचा चक्काचूर, एक गंभीर

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक-पेठ-गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील सावळ घाटात मंगळवारी (दि. 14) सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात घडला. दोन अवजड ट्रकमध्ये मारुती इको कार चिरडली गेल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृत व गंभीर जखमी सर्व प्रवासी गुजरात राज्यातील आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिककडून पेठच्या दिशेने मारुती इको कार (जीजे 15 सीआर 5659) जात होती. सावळ घाटातील तीव्र उतारावर कार आली असता, पाठीमागून येणार्‍या एका ट्रकचे (एमएच 04-जीएफ 8901) अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून हा ट्रक थेट समोरील इको कारवर जाऊन धडकला. घाटात उतार असल्याने या धडकेच्या वेगामुळे इको कार पुढे चाललेल्या दुसर्‍या एका मोठ्या ट्रकच्या (एनएल 01-एसी 1929) पाठीमागून जाऊन धडकली. दोन अवजड ट्रकमध्ये मधेच चिरडल्या गेल्याने इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील दोन पुरुष व एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या चार झाली आहे. अन्य एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मृत व जखमींची नावे समजून घेण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढले व वाहतूक पूर्ववत केली.

Accident at Saval Ghat; four killed.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *