साईनाथनगरमधील रहिवाशांचे मनपाला साकडे
वडाळागाव : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 23 मधील साईनाथनगर परिसरात अनेक महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत साईनाथनगर परिसरातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) रवींद्र धारणकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात साईनाथनगर परिसरात अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने किंवा अजिबात पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी परिसरातील जलवाहिन्यांची तपासणी, व्हॉल्व्हची पाहणी, गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करणे, कुंभातील पाणीसाठ्याची पडताळणी करून नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष साईनाथनगर परिसराची पाहणी करून नागरिकांशी चर्चा करावी आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना अधीक्षक अभियंता धारणकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित अधिकार्यांकडून आवश्यक तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे नागरिकांनी सांगितले.
Not even a drop of water could be found!