तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाचे निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांमुळे संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे गुरुवारी (दि. 16) माजी आमदार अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची भेट घेतली. राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) अनागोंदी कारभाराविरोधात प्रांत कार्यालयावर शिष्टमंडळाने धडक दिली.
यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने प्रांताधिकार्यांसमोर तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतीपंपांना अपुरा व अनियमित वीजपुरवठा, कमी दाबाची वीज, बिघाड दुरुस्तीस होणारा विलंब आणि शेतकर्यांच्या तक्रारींकडे होत असलेले दुर्लक्ष या गंभीर समस्यांचा पाढा वाचला. तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे. दररोज सायंकाळी शिवारात अवाजवी वीज भारनियमन केले जात असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याकडे केल्या. महावितरण कंपनीच्या या अनागोंदी भोंगळ कारभारामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, खरीप हंगाम धोक्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी कसबे सुकेणे आणि वडाळी नजीक येथील प्रस्तावित महावितरणच्या टॉवर लाइनला स्थानिक शेतकर्यांचा तीव्र विरोध असल्याचेही प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान होणार असल्याने त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही काम करू नये आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा तसेच शेतकर्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे निफाड तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनी, शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतकर्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि टॉवर लाइनबाबत शेतकर्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात. अन्यथा शिवसेना शेतकर्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारेल. त्यातून उद्भवणार्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व महावितरणची राहील, असा इशारा दिला.
यावर प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित महापारेषण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र पावरा यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी कसबे सुकेणेचे शेतकरी अशोक आप्पा भंडारे, सुनील लक्ष्मण भंडारे, शुभम भंडारे, सचिन जाधव, बाळासाहेब जाधव, हरिभाऊ जाधव, भारत हिरे, उत्तमराव जोंधळे, विजय जाधव, प्रभाकर हिरे, विक्रम शिंदे, प्रवीण जाधव, सचिन जोंधळे, सुनील भंडारे, गोविंद भंडारे, रणजित देशमुख, योगेश भंडारे विनायक घोलप, बंडू बैरागी, आप्पा घोलप, तानाजी घोलप, गणेश शिंदे व शेतकरी उपस्थित होते.
वीज वितरण कंपनीचा निफाड तालुक्यात सगळीकडे अनागोंदी भोंगळ कारभार सुरू आहे. सर्वत्र शेतकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी गोदाकाठसह निफाड तालुक्यात अवाजवी वीज भारनियमन केले जात आहे. याबाबत तत्काळ सुधारणा न झाल्यास पुढील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.
– खंडू बोडके पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख, निफाड
Shiv Sena marches to the Sub-Divisional Officer’s office to protest against Mahavitaran’s functioning.