इंडियाबुल्स परिसरात पाचवा बिबट्या जेरबंद

पहाटे पिंजर्‍यात अडकला; दोन महिन्यांत पाच बिबटे पकडले

सिन्नर : प्रतिनिधी
मुसळगाव येथील इंडियाबुल्स थर्मल पॉवर प्रकल्प परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात रविवारी (दि. 19) पहाटे आणखी एक बिबट्या अडकला. वनविभागाच्या पथकाने त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत या परिसरात पकडण्यात आलेला हा पाचवा बिबट्या असल्याने वनविभागासमोर आव्हान
वाढले आहे.
बिबट्याच्या हालचाली सातत्याने आढळून येत असल्याने वनविभागाने परिसरात पिंजरा लावला होता. रविवारी पहाटे बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याची माहिती मिळताच सिन्नर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. वनपरिमंडळ अधिकारी तानाजी भुजबळ, वनरक्षक संतोष चव्हाण तसेच वनमजूर बालम शेख आणि मधुकर शिंदे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
बिबट्याला सुरक्षित पकडण्यासाठी इंडियाबुल्स थर्मल पॉवर लिमिटेडच्या अधिकार्‍यांचेही सहकार्य लाभले. मुख्य अभियंता (प्रकल्प व नियोजन) अतुल सोनजे, सी. एम. मिश्रा, हरमिंदर सिंग, श्रीनिवास पुली, संजय यादव, येलगुंडे, दुबे, खैरनार, सूर्यवंशी आणि प्रदीप शिंदे यांनी मदत केली.
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या पिंजर्‍यासह मोहदरी वनोद्यानात हलविण्यात आला असून, पुढील प्रक्रिया वनविभागाकडून करण्यात
येत आहे.
दरम्यान, इंडियाबुल्स थर्मल पॉवर प्रकल्पाची कामे सुरू झाल्याने परिसरातील मानवी वर्दळ वाढली आहे. तसेच दाट झाडी आणि नैसर्गिक अधिवासामुळे या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Fifth leopard captured in the Indiabulls area.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *