मालेगाव मध्यचे 1.26 लाख मतदार संशयाच्या भोवर्‍यात

प्रत्येक नावाची होणार प्रत्यक्ष सुनावणी : सोमय्या

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील तब्बल 1 लाख 26 हजार मतदारांची नावे संशयाच्या भोवर्‍यात आली असून, या प्रत्येक नावाची स्वतंत्र सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पडताळणीत अपात्र ठरणार्‍या मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी दिली.
मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर सोमय्या यांनी प्रशासनालाही लक्ष्य केले. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मतदारांची नावे एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर असल्याचा दावा केला. मतदारांचे मॅपिंग कसे झाले, याची चौकशी करून निष्काळजीपणा करणार्‍या बीएलओंवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर विशेष पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 23 हजार 555 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत सोमय्या यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात नावे यादीत कशी आली, याचीही चौकशी आवश्यक असल्याचे सांगितले. संशयित मतदारांच्या प्रत्येक सुनावणीवेळी निवडणूक अधिकार्‍यांसोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मतदार पडताळणी मोहिमेचा उल्लेख करताना जळगाव, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात समाधानकारक काम झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण विभागात पडताळणीच्या कामात ढिलाई झाल्याचा आरोप करत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार विशाल सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, देवा पाटील, अ‍ॅड. योगेश निकम, लकी गिल, दादा जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

1.26 lakh voters of Malegaon Central under a cloud of suspicion.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *