मांजरगाव, म्हाळसाकोरेत सट्टा अड्डे उद्ध्वस्त

सायखेडा पोलिसांची कारवाई; मुख्य चालक ताब्यात

नाशिक : प्रतिनिधी
मांजरगाव व म्हाळसाकोरे परिसरात सुरू असलेल्या अवैध सट्टा पट्टीच्या व्यवसायावर सायखेडा पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई करत संबंधित अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सायखेडा पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत सट्टा पट्टी सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान सट्टा पट्टीसाठी उभारण्यात आलेले पाल, टेबल, फळे तसेच अन्य साहित्य नेस्तनाबूत करण्यात आले. अवैध व्यवसायासाठी वापरण्यात येणार्‍या वस्तूंची तोडफोड करून अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त
करण्यात आला.
याप्रकरणी सट्टा पट्टी चालविणारा मुख्य चालक सुमित जाधव, सुदाम आढाव यांना पोलिसांनी ताब्यात असून, सायखेडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती
पोलिसांनी दिली.
ही कारवाई सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल दीपक सानप, हेड कॉन्स्टेबल पाटोळे, हेड कॉन्स्टेबल प्रदीप भाबड, एएसआय पाचोरकर तसेच हेड कॉन्स्टेबल पानसरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अवैध सट्टा, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सायखेडा पोलीस सातत्याने कठोर भूमिका घेत असून, अशा कारवाया पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून, अशा प्रकारच्या व्यवसायांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहनही सायखेडा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Satta dens destroyed in Manjargaon, Mhalsakore

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *