– अनिल उदावंंत
वेद, वेदना आणि संवेदना हे वेगवेगळ्या अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात आपण त्यांचा वापर अनेकदा करीत असतो. त्यामुळे हे शब्द सर्वपरिचित आहेत असं आपणास नक्कीच म्हणता येईल. असं असलं तरी मानवाच्या विशाल जीवनपटावर अधिराज्य गाजवित वावरणार्या हजारो-लाखो शब्दांसारखेच हे तीन शब्द आहेत असं समजून आपण त्यांना अगदीच हलक्यात घेणं योग्य
ठरणार नाही.
हे शब्द आपल्याला केवळ काही अर्थ सांगत नाहीत, तर ते मानवी जगण्याचा एक विलक्षण अनुभव उलगडून दाखवतात. म्हणूनच या शब्दांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होतं. त्यांच्या मुळाशी मानवी जाणिवेचा आणि अनुभूतीचा अंतर्मनाच्या स्पंदनांशी जोडला जाणारा एक अदृश्य धागा आहे. आपल्याला त्याचं नीट आकलन झालं तर आपलं जीवन अधिक समृद्ध होऊ शकतं.
‘वेद’ म्हणजे विद्या. त्या अर्थाने वेदाचा अर्थ ज्ञान असाच होतो. अर्थात हे ज्ञान म्हणजे केवळ माहितीचे संकलन नाही. त्यात मानवी जीवनाला दिशा देण्याचं सामर्थ्य आहे. ज्याच्या हाती ज्ञान आहे, त्याच्या विवेकाचा दीप प्रज्वलित होऊन अंतरंगातला अंधार कमी होतो.
वेदना ही एका विशिष्ठ प्रकारचे ज्ञानच आहे. ते जाणीव किंवा अनुभवाच्या स्वरुपात असते. विशेषतः मानवी मन अथवा शरीराला नकोशी होणारी जाणीव किंवा नकोशा अनुभवाला ‘वेदना’ असं म्हटलं जातं.
वेदना आपल्याला अस्वस्थ आणि अस्थिर करते. या अस्वस्थतेच्या किंवा अस्थिरतेच्या हेलकाव्यांना आपण ‘वेदनेच्या कळा’ असं म्हणतो. त्या माणसाला विचार करायला लावतात. हा विचार करताना माणूस अंतर्मुख होऊ लागतो आणि त्यातून त्याला नवी जाग येऊ शकते.
‘संवेदना’ म्हणजे वेदनेची जाणीव किंवा अनुभवाचा मानवी मनावर उमटणारा ठसा होय. दुसर्याच्या दुःखाकडे पाहून आपल्या डोळ्यात पाणी उभं राहतं. दुसर्याची वेदना ही जणू आपलीच वेदना आहे असं वाटून आपलं काळीज हलतं, हेलावतं. अगदी कळत-नकळत आपले हात मदतीसाठी पुढे सरसावतात. ही संवेदनेची उदाहरणं आहेत. थोडक्यात माणसाला माणसाशी जोडते ती संवेदना होय. वेद, वेदना आणि संवेदना या संकल्पनांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की, या संकल्पना एकमेकांशिवाय पूर्ण होत नाहीत. वेद ज्ञान देतात, वेदना त्या ज्ञानाला खोल अर्थ देतात, आणि संवेदना त्या अर्थाला मानवी प्रेमाची उब देतात. संवेदनाहिन ज्ञान कोरडे व निरुपयोगी ठरते. ज्ञानाशिवाय वेदना ही त्या जीवाची व्यर्थ तडफड असते आणि एखाद्या वेदनेप्रति आपण संवेदनाशून्य असणं हे आपल्यातील माणुसकी नष्ट झाल्याचं ठळक
लक्षण असतं.
जसं की, एखादा थकलेला वृद्ध रस्त्यावर बसला आहे. त्याला नक्की काय झालंय, हे समजणं म्हणजे वेद होय. त्याच्या पायातील जखम किंवा थकव्याची कळ म्हणजे वेदना आणि त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस करणं, त्याला आधार देणं, गरज असेल तर पाणी वगैरे देणं ही संवेदना होय. या एका छोट्याशा प्रसंगातून मानवी जीवनातील संपूर्ण तत्त्वज्ञानाचं सार सांगता येतं.
इथं आपण हे समजून घ्यायला हवंय की, वेद, वेदना आणि संवेदना ही केवळ शब्दमालिका नाही; तर ती मानवी अस्तित्वाची त्रिपुटी आहे. वेद हा ज्ञानाचा दीप आहे, वेदना ही अंतर्मनाचा ठोका आहे आणि संवेदना हा माणुसकीचा श्वास आहे. ही त्रिपुटी जिथं जपली जाते, तिथं जीवन अधिक अर्थपूर्ण, अधिक सुसंवादी आणि अधिक सुंदर बनतं.
एखादा माणूस संवेदनशील आहे म्हटलं की, आपल्या मनात पटकन दुखावणारा, भावनांच्या आहारी जाणारा किंवा जगाच्या व्यवहारात टिकाव धरू न शकणारा माणूस अशी एक प्रतिमा उभी राहते.एखाद्या अतिरंजित विचारसरणीशी स्वतःला जोडणं, आंधळा विश्वास ठेवून एखाद्या तथाकथित श्रीगुरूंच्या मागे चालणं, अधाशासारखं सतत पुस्तक, वृत्तपत्र, मासिक यापैकी काहीतरी वाचत राहणं, सोशल मीडियाचा बेसुमार वापर करणं, सतत विविध धार्मिक विधी करत रहाणं किंवा भजन, कीर्तन, पूजापाठ वा अन्य कर्मकांड करीत रहाणं यासारख्या गोष्टींकडे त्यांचा अधिक कल असतो. त्यांना असं वाटतं की, यामुळे ते अधिक जागरूक, ज्ञानी किंवा आध्यात्मिक होत आहेत.
प्रत्यक्षात या गोष्टी मानवी मनाला अधिक बोथट करीत असतात. या गोष्टी वाईट नाहीत हे खरंच पण तरीही अनेकांसाठी हे वास्तवापासून दूर पळण्याचेच मार्ग असतात. कारण या सर्वांच्या मागे मनातलं दुःख, भीती आणि रिकामेपण यापासून दूर जाण्याचा हेतू दडलेला असतो.
संवेदनशीलता ही कोणत्याही सवयीने किंवा सरावाने निर्माण होत नाही. उलट सवयी आणि सराव मनाला यांत्रिक बनवतात. विशिष्ट पद्धतीने विचार करणं, विशिष्ट चौकटीत जगणं, ‘मी काहीतरी विशेष आहे’ ही भावना जोपासणं यासारख्या बाबींमुळे मनाची लवचिकता नष्ट होते. मन असं साचेबद्ध होऊ लागलं की आपली संवेदनशीलता मरू लागते.
संवेदनशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे. उलट, संवेदनशील मनच वास्तवाला अधिक स्पष्टपणे पाहू शकतं. ते स्वतःच्या मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि असुरक्षितता नेमकेपणाने ओळखू शकतं. जे मन स्वतःला समजून घेऊ शकतं, तेच खर्या अर्थाने सक्षम असतं. संवेदनशील मन कोणत्याही एका निष्कर्षाला कायम चिकटून राहत नाही. ते इतरांना ऐकू शकतं, समजू शकतं आणि त्यांच्या अनुभवाशी जोडलं जाऊ शकतं. ज्या मनात संवेदनशीलता असते, ते मन जीवंत असतं, प्रेमळ असतं आणि तेच सत्याचा शोध घेण्यास सक्षम असतं. अशा मनालाच खर्या अर्थानं स्वातंत्र्य, प्रीती आणि जीवनाचं सौंदर्य अनुभवता येतं. याच कारणासाठी संवेदनशीलता हा गुण केवळ वैयक्तिक नव्हे, तर तो समाजाच्या पातळीवरही जोपासला जायला हवा.
Veda (Knowledge/Scripture), Pain, Sensation, and Sensitivity