– मनीषा चौधरी
कठीण काळातही धैर्याचा दिवा विझू देऊ नको, नशिबाच्या वादळाला कधी घाबरून जाऊ नको. रात्र कितीही काळी असली तरी पहाट नक्की होते, तुझा वक्तही येईल, फक्त संयम सोडायला शिकू नको! अनेकदा आयुष्यात असा टप्पा येतो की, जिथे आपला स्वतःवरचा विश्वासही डळमळीत होऊ पाहतो. आपण आजवर केलेल्या चांगल्या कामांचा, कष्टांचा आणि प्रामाणिकपणाचा जणू कस लागत असतो. भोवताली अनिश्चितेचा तम इतका दाटून येतो की, समोरचा रस्ता दिसेनासा होतो. सगळं काही गोठल्यासारखं वाटतं; तहान, भूक, मनःशांती आणि स्वास्थ्य सगळंच हरवून बसतं. त्या कोंडीतून, त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जीवतोड धडपड करावीशी वाटते, परंतु जणू आपल्या हाती आता काहीच उरलेले नाही, आपण पूर्णपणे हतबल झालो आहोत, अशी भावना मनात घर करते. अशावेळी निराशेचा आणि अनिश्चितेचा तो काळोख दूर करण्यासाठी कुठूनसा एक आशेचा किरण मनाच्या कोपर्यात चमकतो. तो किरण म्हणजे दुसरं काही नसून, आपल्या अंतर्मनातून उमटलेले, आपल्याला धीर देणारे सकारात्मक शब्द असतात- तू बस सब्र कर, वक्त तेरा भी आयेगा!
एका गावात माधव नावाचा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू कुंभाराचा मुलगा राहत होता. तो मातीपासून अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती बनवायचा. गावातल्या मोठ्या उत्सवासाठी एका भव्य मूर्तीची गरज होती, आणि हे काम गावकर्यांनी माधवला दिले. माधवला मनासारखे काम करण्याची मोठी संधी मिळाली होती. त्याने रात्रीचा दिवस करून, प्रचंड मेहनत घेऊन एक अप्रतिम आणि भव्य मूर्ती घडवली. मूर्ती एवढी सुंदर झाली होती की जो तो तिचे कौतुक करत होता. माधवला वाटले, आता आपले नशीब बदलणार, आपल्याला
मानसन्मान मिळणार.
पण उत्सवाच्या अवघ्या दोन दिवस आधी गावात अचानक ढगफुटी झाली. मुसळधार पाऊस कोसळला आणि नदीला पूर आला. माधवच्या झोपडीत पाणी शिरले. त्याने जिवाचा आकांत करून मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ती ओल्या मातीची भव्य मूर्ती डोळ्यांदेखत विरघळली आणि वाहून गेली. माधवचे वर्षभराचे कष्ट, त्याचे स्वप्न आणि गावकर्यांचा विश्वास क्षणात मातीमोल झाला.
उत्सवाच्या दिवशी गावकर्यांनी दुसर्या एका प्रसिद्ध कुंभाराकडून घाईघाईत मूर्ती आणली आणि त्याचा मोठा सत्कार केला.
माधव एका कोपर्यात उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात तीव्र निराशा. त्याला वाटले की विधात्याने त्याच्यावर मोठा अन्याय केला आहे. त्याच्या हातपाय गळून पडले.
अशाच एका निराश संध्याकाळी गावचे एक वृद्ध, अनुभवी साधू माधवच्या झोपडीपाशी आले. माधवने रडत रडत त्यांना विचारले, महाराज, मी इतका प्रामाणिक होतो, इतकी मेहनत केली, मग निसर्गाने माझीच मूर्ती का नष्ट केली? माझ्या नशिबात फक्त अपयशच का लिहिले आहे?
साधू महाराज शांतपणे हसले. त्यांनी जमिनीवर पडलेली तीच वाहून आलेली ओली माती हातात घेतली आणि म्हणाले, माधवा, जेव्हा पूर आला, तेव्हा या मातीने पाण्याचा मारा सहन केला. ती विरघळली कारण तिला अजून जास्त शुद्ध आणि पक्के व्हायचे होते. पूर ओसरल्यानंतर या मातीमध्ये जी मऊपणा आणि ताकद आली आहे, ती आधी नव्हती. निसर्गाने तुझे काम नष्ट केले नाही, तर तुला अजून मोठी संधी देण्यासाठी तुझी माती अधिक परिपक्व केली आहे. जरा धीर धर, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा कामाला लाग.
माधवला साधूंच्या शब्दांमागचा अर्थ समजला. त्याने हार न मानता, त्याच मातीला पुन्हा एकत्र केले. या वेळी त्याचा संयम आणि अनुभव दुप्पट होता. त्याने पुन्हा मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. दोन महिन्यांनी राजाच्या राजवाड्यातून काही अधिकारी गावात आले. त्यांना राजाच्या मुख्य मंदिरासाठी एक अद्वितीय मूर्ती हवी होती. त्यांनी गावातल्या सगळ्या मूर्ती पाहिल्या, पण माधवने बनवलेली नवीन मूर्ती पाहताच ते थक्क झाले. ती मूर्ती पूर्वीपेक्षा कितीतरी पट अधिक जिवंत, सुंदर आणि मजबूत होती. राजाने माधवला राज्याचा ‘मुख्य शिल्पकार’ म्हणून घोषित केले आणि त्याला सुवर्णमुद्रा देऊन सूर्चिंत केले. ज्या गावकर्यांनी त्याला नाकारले होते, तेच आज त्याच्या पाया पडत होते. माधवच्या अंतर्मनातून एकच आवाज आला- ‘सब्र’चे फळ थोडे उशिरा मिळाले, पण जे मिळाले ते कल्पनेपलीकडचे होते.
या कथेप्रमाणेच, जेव्हा पुढचे सगळे रस्ते बंद झालेले दिसतात, तेव्हा निसर्गाचा एक शाश्वत नियम नेहमी लक्षात ठेवावा- रात्रीचा अंधार जितका गडद आणि भयानक असतो, पहाटेची नवी सोनेरी किरणे तितकीच जवळ असतात. आपण मातीत पेरलेल्या एका छोट्याशा बीजाला सुद्धा अथांग झाड होऊन गगन भरारी घेण्यासाठी, सुरुवातीला मातीच्या गडद अंधारात, शांतपणे काही काळ घालवावा लागतो. तो काळ थांबण्याचा किंवा संपण्याचा नसतो, तर आतून अधिक मजबूत होण्याचा, स्वतःची मुळे घट्ट रोवण्याचा असतो. जेव्हा बाह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, तेव्हा स्वतःच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव आणि
सर्वोत्तम मार्ग उरतो.
लोक तुमच्याबद्दल आज काय बोलतात, हे जग सध्या तुमच्या अपयशाकडे किंवा संघर्षाकडे कसं पाहतं, याने तुमच्या अस्तित्वाला काहीच फरक पडत नाही. कारण लोकांचे दृष्टिकोन परिस्थितीनुसार बदलत असतात. तुमची अहोरात्र चाललेली मेहनत, तुमचा प्रामाणिकपणा आणि शांततेत गाळलेले तुमचे अश्रू या प्रत्येकाची किंमत त्या विधात्याला, निसर्गाला ठाऊक असते. कष्टाचे फळ मिळायला कदाचित थोडा उशीर होऊ शकतो, पण ते कधीही नाकारले जाऊ शकत नाही. आज जी कठीण परिस्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करत आहे, नीट पाहिले तर तीच परिस्थिती उद्या तुम्हाला अधिक खंबीर, समजूतदार आणि अनुभवी बनवण्यासाठी आलेली असते.
त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही कठीण काळात, अपयशाच्या गर्तेत खचून न जाता, प्रत्येक श्वासासोबत स्वतःला ठामपणे सांगावे की, ही वेळही निघून जाईल, दिवस नेहमी सारखे राहत नाहीत. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, हेतू शुद्ध असेल आणि कष्टांमध्ये सातत्य असेल, तर विधात्याच्या घरी उशीर असू शकतो पण अंधेर नक्कीच नाही. योग्य वेळेची वाट पाहणे आणि त्या काळात स्वतःला सिद्ध करत राहणे म्हणजेच ‘सब्र’ (संयम) होय. आजचा संघर्ष उद्याचे यश निश्चित करणार आहे. त्यामुळे खचू नका, थांबू नका; फक्त स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि मनाशी गुणगुणत राहा: सब्र कर, वक्त तेरा भी आयेगा!
Belief in Karma