ओझरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

नाशिकच्या सात संशयितांवर गुन्हा

ओझर : वार्ताहर
येथील यात्रा मैदानाजवळील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर उभा असलेल्या एका तरुणावर संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित सुधाकर म्हस्के (वय 25, रा. श्रमिकनगर, ओझर) हा 22 तारखेला मंडळ अधिकारी कार्यालयात कामासाठी आला होता. काम उरकून तो कार्यालयासमोर मित्रासोबत उभा असताना संशयित आरोपी संतोष पाणमंद, शोएब बब्बर व त्याचा मुलगा, शशिकांत केदारे व त्याचा मुलगा, आशिष अहिरे आणि पंडित अहिरे (सर्व रा. नाशिक) तेथे आले. “तू इथे कशाला थांबला आहेस?” असे विचारत त्यांनी सुमितसोबत वाद घातला. सुमितने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, संशयित शोएब बब्बर याने हातातील चॉपरने सुमितच्या डोक्यावर व मानेवर वार केले. यामुळे जोरदार रक्तस्राव झाला. इतर संशयितांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ‘तुला इथेच मारून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी सुमित म्हस्के याने ओझर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्याच्या अर्जावरून पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात मारहाण व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Youth attacked with intent to kill in Ozar due to past enmity.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *