कसबे सुकेणेत पार्थिवाचा चिखलातून प्रवास, प्रशासनाविरोधात संताप
निफाड : तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यात सधन अन् प्रगत तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे प्रशासकीय दुर्लक्षाचे विदारक चित्र समोर आले आहे. रस्त्याअभावी ज्येष्ठ नागरिकाच्या पार्थिवाला चिखलातून थेट बैलगाडीतून न्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने विकासाच्या दाव्यांचे धिंडवडे निघाले आहेत.
गावातील ज्येष्ठ नागरिक संपतराव काळे यांच्या निधनानंतर, वस्तीकडे जाणारा रस्ता चिखलमय असल्याने तेथे कोणतेही वाहन पोहोचू शकले नाही. महसूल नकाशात गोंडेगाव रस्ता अधिकृतपणे नोंदवलेला असतानाही वर्षानुवर्षे या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. प्रशासनाने खडीकरण किंवा मजबुतीकरण न केल्याने पावसाळ्यात हा रस्ता संपूर्ण दलदलीत बदलतो. परिणामी, नाइलाजाने काळे यांचे पार्थिव बैलगाडीत ठेवून चिखलातून अंत्ययात्रा काढावी लागली. या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पावसाळ्यातील चार महिने वाहतूक पूर्णपणे ठप्प असते. यामुळे शेतीमालाची वाहतूक, आजारी रुग्ण आणि विद्यार्थ्यांची ये-जा पूर्णपणे कोलमडते. जिवंतपणी या हालअपेष्टा सहन कराव्या लागतातच, पण मृत्यूनंतरही सन्मानाने अंतिम प्रवास करता न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हा वेदनादायी प्रसंग प्रशासनाला जाग आणणारा ठरावा. संबंधित विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून रस्त्याचे खडीकरण करावे, अशी ठाम मागणी कसबे सुकेणे ग्रामस्थांनी केली आहे.
Claims of development exposed: Funeral procession on a bullock cart due to lack of roads!