नांदूरमध्यमेश्वर धरणातून 89 हजार क्यूसेकचा विसर्ग
निफाड : तालुका प्रतिनिधी
इगतपुरी व त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा व कादवा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगापूर, दारणा, मुकणे, भाम, भावली व पालखेड धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी दुपारी 89 हजार क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे सायखेडा, चांदोरी व शिंपी टाकळी या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला.
परिसरातील प्रमुख रस्ते व पूल पाण्याखाली गेल्याने गोदाकाठचा निफाड व नाशिकशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
यंदा प्रथमच आलेल्या महापुरामुळे गोदाकाठची शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. सायखेडा व चांदोरी येथील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्याने रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच सखोल भागातील सुमारे 200 नागरिकांना गावालगत सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या भोजनाची सोय ग्रामपंचायतीतर्फे करण्यात
आली आहे.
पुराच्या परिस्थितीची आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गिते, तहसीलदार विशाल नाईकवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी पाहणी केली. प्रशासनाने सायखेडा पुलाला अडकलेल्या पाणवेली हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे व नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
सखल भागातील रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. सर्व सरपंचांना दवंडी देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याच्या व गोदाकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. – विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड
Saikheda, Chandori, and Shimpi Takli Surrounded by Floodwaters