मुंबई : प्रतिनिधी
पश्चिम-मध्य रेल्वेने काउंटरवरून होणार्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला असून, 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन ‘टोकन सिस्टीम’ लागू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी कमी करणे, बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि प्रवाशांच्या वेळेची बचत करणे हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांना आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी रिझर्व्हेशन काउंटरवर वारंवार खेटे मारण्याची गरज भासणार नाही.
नवीन नियमानुसार, बुकिंगची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी टोकन वाटपाच्या नव्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. एसी क्लासच्या तत्काळ तिकिटांसाठी सकाळी 8.30 ते 9.00 या वेळेत टोकन दिले जाईल, तर नॉन-एसी (स्लीपर) क्लाससाठी सकाळी 9.00 ते 9:30 या वेळेत टोकन उपलब्ध असतील. प्रत्येक रिझर्व्हेशन काउंटरवर एसी क्लाससाठी 10 आणि नॉन-एसी क्लाससाठी 15 टोकन देण्याची प्राथमिक मर्यादा आखून देण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी आणि स्थानिक गरजेनुसार या संख्येत बदल करण्याचे अधिकार रेल्वे अधिकार्यांना असतील.
प्रवाशांचा वेळ, कष्ट वाचणार
या नव्या सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांची तिकीट खिडकीवरील दुहेरी फेरी वाचणार आहे. यापूर्वी प्रवाशांना आधी टोकन मिळवण्यासाठी आणि नंतर प्रत्यक्ष बुकिंगसाठी असे दोन वेळा रांगेत उभे राहावे लागत होते. आता तत्काळ बुकिंग सुरू होण्यापूर्वीच टोकन मिळणार असल्याने प्रवासी आपली वेळ आल्यावर थेट बुकिंग करू शकतील. तसेच, हे दिले जाणारे टोकन पूर्णपणे अहस्तांतरणीय असून, ज्याच्या नावावर टोकन असेल त्याच व्यक्तीला तिकीट दिले जाईल, ज्यामुळे या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल.
Tatkal ticket booking rules to change from August 1st.