वीज उपकेंद्रातील 11 लाखांचे साहित्य केले होते लंपास
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका वीज उपकेंद्राच्या (इलेक्ट्रिक सबस्टेशन) साइटवर प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकणार्या 11 संशयितांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले. या कारवाईत दरोड्यातील चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 26) पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण इलेक्ट्रिकलचे साइट सुपरवायझर ज्ञानेश्वर अशोक सुळे, तसेच दत्ता मारुती पवार आणि मुकेश प्रदीप नर्पे हे साइटवर उपस्थित असताना 11 जणांच्या टोळीने पिस्तूल व इतर प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकला. आरोपींनी पाच मोबाइल फोन, साइटवरील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर तसेच इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये वापरण्यात येणार्या एसक्यूएम कंडक्टर वायरचे दोन ड्रम असा एकूण 11 लाख 11 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. घटनेनंतर फिर्यादी ज्ञानेश्वर सुळे यांनी तातडीने डायल 112 वर संपर्क साधून त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि गस्तीवरील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा पाठलाग केला. सापळा रचून 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून दरोड्यातील महिंद्रा ट्रॅक्टर, एसक्यूएम कंडक्टर वायर, पाच मोबाइल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, लोखंडी कटर, कुर्हाड, तलवार, कोयता, पक्कड आणि स्क्रूड्रायव्हर असा सुमारे 6 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तसेच इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्याचे काम त्र्यंबकेश्वर पोलीस
करीत आहेत.
11 dacoits apprehended with stolen goods in Trimbak.