– डॉ. किशोर पवार
जटिंगा हे आसाममधील रहस्यमय गाव, जिथे दरवर्षी ठराविक कालावधीत आकाशातून पक्षी जमिनीवर आदळतात आणि आत्महत्या करतात! या अद्भुत घटनेमुळे आसामच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेले जटिंगा हे छोटेसे गाव जगभरातील पक्षीप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि वैज्ञानिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. दिमा हासाओ जिल्ह्यातील हे गाव हाफलाँगपासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या शांत गावाची ओळख मात्र एका अत्यंत विलक्षण नैसर्गिक घटनेमुळे जगभर झाली आहे. वर्षातील विशिष्ट काळात, विशेषतः पावसाळ्यानंतरच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत, काही विशिष्ट हवामान परिस्थितीत अनेक पक्षी रात्रीच्या वेळी अचानक खाली येताना किंवा झाडे, बांबू, इमारती आणि जमिनीवर आदळतांना दिसतात.
पूर्वी या घटनेला इळीव र्डीळलळवश म्हणजेच पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या असे म्हटले जात असे. परंतु, पक्षीतज्ज्ञांच्या अभ्यासानंतर हे स्पष्टीकरण वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नसल्याचे स्पष्ट झाले. पक्षी स्वतःहून मृत्यूकडे झेपावत नाहीत; उलट विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीमुळे त्यांचा दिशाभ्रम होतो आणि ते प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होऊन खाली येतात, अशी अधिक स्वीकारार्ह वैज्ञानिक मांडणी आहे. तरीही जटिंगातील ही घटना नेमकी का घडते, याचे एकमेव आणि सर्वमान्य उत्तर आजही उपलब्ध नाही.
ही घटना प्रामुख्याने अंधार्या, चंद्रविरहित रात्री, दाट धुके, हलका पाऊस किंवा रिमझिम आणि विशिष्ट दिशेने वाहणारे वारे अशा परिस्थितीत अधिक दिसून येते. आसाम पर्यटनाच्या अधिकृत माहितीनुसार, जटिंगाच्या एका अरुंद पट्ट्यात सुमारे 1.5 किलोमीटर लांब आणि 200 मीटर रुंद क्षेत्रात ही घटना विशेषत्वाने आढळते. काही पक्षी शक्तिशाली कृत्रिम प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि प्रकाशाच्या आसपास घिरट्या घालताना किंवा खाली उतरताना झाडे व इतर वस्तूंवर आदळतात.
यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथे आढळणारे पक्षी केवळ लांब पल्ल्याचे स्थलांतर करणारे पक्षीच असतात असे नाही. टायगर बगळा, काळा बगळा, लहान बगळा, डबक्यातील बगळा, डब्बा, भारतीय, खंड्या, पाचू कवडा, हिरवे कबुतर आणि काळा कोतवाल यांसारख्या विविध प्रजातींची नोंद या परिसरात झाली आहे. त्यामुळे ही घटना केवळ स्थलांतरित पक्ष्यांची आत्महत्या म्हणून पाहणे योग्य नाही.
धुके, वारा व प्रकाशाचा गुंता
वैज्ञानिकांच्या मते, जटिंगाच्या डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे निर्माण होणारे स्थानिक वार्यांचे प्रवाह आणि अचानक बदलणारे हवामान पक्ष्यांच्या नेव्हिगेशन प्रणालीवर परिणाम करू शकतात. दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे पक्ष्यांना त्यांच्या नेहमीच्या निवासस्थानाकडे परतण्याचा मार्ग शोधणे कठीण होऊ शकते. त्याच वेळी गावातील दिवे किंवा इतर कृत्रिम प्रकाश त्यांना दिशादर्शकासारखे भासू शकतात. त्यामुळे ते प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात आणि दिशाभ्रमित अवस्थेत खाली येतात. जगातील इतर भागांमध्येही रात्रीच्या वेळी स्थलांतर करणार्या पक्ष्यांवर कृत्रिम प्रकाशाचा परिणाम होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे जटिंगातील घटना समजून घेताना हवामानशास्त्र, पक्ष्यांचे स्थलांतर, प्रकाशप्रदूषण आणि भौगोलिक रचना या सर्व घटकांचा एकत्रित विचार करणे
आवश्यक आहे.
2017 मध्ये पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप केला. वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने पक्षी पकडण्यासाठी जाळी, काठ्या आणि इतर साधनांच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
रहस्य अजूनही कायम
2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्येही जटिंगातील घटना सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान विशिष्ट हवामान परिस्थितीत घडत असल्याचे नमूद करण्यात आले असून, कृत्रिम प्रकाश, धुके, वार्यांचे प्रवाह, अधिवासातील बदल आणि संभाव्य भू-चुंबकीय घटक यांचा एकत्रित परिणाम असू शकतो, अशी विविध मते मांडली गेली आहेत.
Bird suicide or disorientation?