प्रतिज्ञा…ध्येय…दीपस्तंभ

– सविता एरंडे

सोनू, ए सोनू, कुठं आहेस तू? अगं, आठ वाजले. स्कूलला जायचं नाही का आज? मी माझ्या लाडू बाईला.. नातीला हाक मारत मारत तिच्या अभ्यास खोली- जवळ आले. तर बाईसाहेब आरशासमोर उभ्या राहून, एक हात पुढं करून, भारत माझा देश आहे. सारे…सारे…सारे.. पुढचं वाक्य मी पूर्ण करत म्हणाले, भारतीय माझे बांधव आहेत…
हे काय गं आजी? ही प्रतिज्ञा माझी पाठच होत नाहीय गं… उद्या मला सर्वांना प्रतिज्ञा म्हणायला सांगायची आहे. होईल का गं माझी पाठ?
अगं, होईल सोनू. नक्की होईल. तू शाळेतून आलीस ना की मी तुझी पाठ करून घेईन हं. आता पटापट आवर बरं. तुझी शाळेची बस येईल.
हो, आज्जु. आवरते मी. असं म्हणत सोनू घरात पळाली.
संध्याकाळी सोनू शाळेतून घरी आल्यानंतर तिच्या आवडीची भेळ खाऊन खेळायला पळाली. नेहमीच्या वेळेपेक्षा आज जरा लवकरच ती घरी आली. हात पाय धुवून देवाला नमस्कार करून शुभंकरोती म्हटल्यानंतर ती माझ्याजवळ आली व म्हणाली, आज्जु, चल ना गं! तू माझ्याकडून प्रतिज्ञा पाठ म्हणून घेणार आहेस ना ? प्लीज, चल ना!
हो, हो, चल, चल. आपण प्रॅक्टिस करूया… पण सोनूचं पाठांतरात लक्ष कुठं होतं? तिची सारखी चलबिचल चालूच होती. दोन-तीन वेळा प्रतिज्ञा म्हणून झाल्यानंतर ती लगेचच म्हणाली, आज्जू,
शाळेत दररोज आम्ही प्रतिज्ञा म्हणतो… पण प्रतिज्ञा म्हणजे काय गं? आमच्या टीचर फक्त आज प्रतिज्ञा कोण सांगणार आहे? एवढंच म्हणतात. पण प्रतिज्ञा म्हणजे काय? आणि ती दररोज का म्हणायची? ते त्यांनी सांगितलंच नाही.
मला सोनूच्या चलबिचल हालचालीचं रहस्य कळलं. सोनू, अगं प्रतिज्ञा म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा निश्चय मनातल्या मनात करणे आणि तो निश्चय पूर्ण करण्यासाठी दररोज वेळ देऊन प्रयत्न करणे… म्हणजे, मी शाळेच्या एखाद्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात नंबर यावा म्हणून मी त्यासाठी दररोज प्रयत्न केला. तर ती पण प्रतिज्ञा असते का गं?
हो गं चिमणे ! त्याला निश्चय म्हणतात. म्हणजे
प्रतिज्ञेचं छोटं भावंडं ! समजलं? बरं, आता पुन्हा एकदा प्रतिज्ञा म्हण बघू. सोनूनं प्रतिज्ञा म्हणून दाखवली व ती पळाली.
परंतु, माझ्या डोक्यात मात्र ते प्रतिज्ञेचं पिल्लू वळवळ करू लागलं आणि मग काय? आमचं चिंतन सुरू…आणि ते पेन मधून झरझर कागदावर उतरू लागलं… मला प्रतिज्ञा म्हटलं की लगेच महाभारतातील पितामह भीष्माचार्य आठवले. शूर योध्दा भीष्माचार्य कौरव पांडव या दोघांचेही प्रमुख होते. म्हणूनच त्यांना सर्वजण पितामह असं म्हणत. भीष्मांनी हस्तिनापूरच्या सिंहासनावर न बसण्याची आणि आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि आजन्म ते ब्रह्मचारीच राहिले.त्यांची ही प्रतिज्ञा ऐतिहासिक अशी ठरली…
प्रतिज्ञा/नेम/पण/निश्चय/शपथ हे सर्व शब्द एकाच कुळातले आहेत. या सर्वांचं गोत्र एकच आहे. प्रतिज्ञा ही या सर्वांची मोठी बहीण! म्हणजेच कुलदीपिका! हीचा थाट अगदी सम्राज्ञी सारखाच असतो. कारण हिच्या पूर्णत्वानंतर विजयश्रीची माळ गळ्यात पडते ना !
प्रतिज्ञेशी मैत्री करण्यासाठी मन हे संयमाधिष्ठितच असायला हवं. मनाची अविचलता कायम हवी. जिद्द, चिकाटी हवी. अथक परिश्रम व तपश्चर्येनंतरच प्रतिज्ञा पूर्णत्वास येते. आपल्या मनातील संकल्पना,काही स्वप्नं साकार होतात.
हिंदवी स्वराज्य संस्थापक ‘राजा शिवछत्रपती यांनी मावळ्यांना बरोबर घेऊन रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. ही शपथ म्हणजेच प्रतिज्ञा होय. ही प्रतिज्ञा पूर्णत्वाला येण्यासाठी त्यांना कितीतरी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. रणसंग्राम, छोट्या मोठ्या लढाया कराव्या लागल्या. बर्‍याच काळानंतर त्यांची ही प्रतिज्ञा पूर्णत्वास आली. त्यावेळी राजा शिवछत्रपती म्हणाले, हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा!.
नवीन वर्ष सुरू झालं की, अनेक लोक वेगवेगळे निश्चय करतात. वैयक्तिक, सामाजिक, अध्यात्मिक स्तरांवर या निश्चयांचं स्वरूप असतं.परंतु नव्याचे नऊ दिवस झाले की या सर्व आरंभशूरांचे निश्चय मैदान सोडून पळून जाऊ लागतात.हे सर्व निश्चय तात्पुरते, काही काळासाठी असतात. शेवटपर्यंत निश्चय यशस्वी करणारे अगदी बोटांवर मोजता येतील एवढेच असतात. जेव्हा प्रतिज्ञेची पूर्तता होते, तेव्हा होणारा आनंद व समाधान खरोखर अनमोल असंच असतं.फारच थोडे लोक प्रतिज्ञेचं मैदान काबीज करणारे प्रतिज्ञा वीर असतात. प्रतिज्ञेच्या
कळसापर्यंत पोहोचतात.
चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात आर्य चाणक्य मंत्री म्हणून होते. त्यांचा भर दरबारात अपमान झाला. तेव्हा आर्य चाणक्यांनी आपले केस मोकळे सोडले व प्रतिज्ञा केली की, या मौर्य साम्राज्याचा पाडाव करीन तेव्हाच मी माझ्या शेंडीला गाठ मारेन. त्याप्रमाणे त्यांनी मौर्य साम्राज्याचा पाडाव केला व शेंडीला गाठ मारली. आर्य चाणक्य अतिशय नीतिवंत व कडक शिस्तीचे होते. त्यांचा चाणक्य नीति हा महान ग्रंथ असून मानवी जीवन, नैतिकता याचे विविध पैलू या ग्रंथातून उलगडले आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञा प्रसिद्ध आहेत. तर स्वामी विवेकानंदांनी देशाच्या आणि समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली होती. रामायण, महाभारतातील अनेक व्यक्तिरेखांनी विविध प्रकारच्या प्रतिज्ञा केलेल्या आढळतात. महर्षी नारद मुनी यांनी भागवतात प्रतिज्ञा केलेली आहे. ती अशी… भगवंता, तुला प्रत्येकाच्या हृदयात स्थापन करेन.अशा अलौकिक प्रतिज्ञा करणार्‍या आदर्श व्यक्तिरेखा खरोखर वंदनीय अशाच आहेत. शाळेमध्ये दररोज राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणतातच. परंतु स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांच्या दिवशीदेखील समूह प्रतिज्ञा होते.
सध्या आपल्याला पर्यावरण रक्षणाच्या, प्रदूषण नष्ट करण्याच्या प्रतिज्ञेची फार आवश्यकता आहे.सिमेंटच्या या जंगलात सर्वत्र कचर्‍याचे ढीग दिसतात. प्लास्टिकचा अनिर्बंध वापर, झाडांची बेसुमार कत्तल या सर्वांमुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. श्वास घेण्यासाठी आवश्यक त्या ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. यासाठीच आपण आज प्रतिज्ञा करूया… मी एक तरी झाड लावेन व त्याला वाढवेन. माझा परिसर मी स्वच्छ ठेवेन. मी प्लास्टिकचा वापर करणार नाही. बाहेर जाताना मी एक कापडी पिशवी माझ्याजवळ ठेवेन.
मग चला तर मग… आपण
पर्यावरण संवर्धन जागृती मोहीम सुरू करूया.

Pledge… Goal… Beacon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *