दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे दिंडोरी शहराची दुरवस्था झाली आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण शहर जलमय झाले असून, व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांची तारांबळ उडाली. पावसाच्या प्रचंड तीव्रतेमुळे नाशिक-दिंडोरी-वणी या प्रमुख महामार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, रस्त्यावरील पाणी थेट मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरले. शहरातील पंजाब नॅशनल बँक आणि लगतच्या ग्राहक सेवा केंद्रात पाणी शिरल्याने बँक व केंद्रातील महत्त्वाचे कागदपत्रे भिजून खराब झाले. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू व साहित्याचेही आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी मुसळधार पावसातही शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा निचरा केला आणि अनर्थ टाळला.
शहरातील धामण नदीला रौद्ररूप प्राप्त झाले. पाणी पातळी क्षणार्धात वाढल्याने गावातील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. तसेच पालखेड बंधारा रस्त्यावरील पुलावरूनही पुराचे पाणी वाहू लागल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करून दुसर्या मार्गाने वळवण्यात आली.
निळवंडी रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. धामण नदीला आलेला पूर आणि पुलावरून वाहणार्या पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी नदीकाठी गर्दी केली होती. अनेक जण जिवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो व व्हिडिओ काढताना दिसले.
दरम्यान, तीन तासांनंतर पावसाने विश्रांती घेतल्यावर पाण्याचा निचरा झाला; मात्र मुख्य बाजारपेठेत सर्वत्र घाण व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी होत आहे.
Dindori town inundated