दिंडोरी तालुक्यात अतिवृष्टीचा कहर

नद्यांना महापूर, करंजवण, पुणेगाव, पालखेड धरणांतून विसर्ग

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार पुनरागमन केले. सकाळी आठपासून तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सर्वच नदी-नाल्यांना पूर आला, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेला मुसळधार पावसाचा अंदाज खरा ठरला.
पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. तालुक्यातील सर्वांत मोठे करंजवण धरण 74 टक्के भरले असून, धरणातून कादवा नदीत 6,800 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे ओझे-करंजवण पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद
केली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाईल, अशी माहिती शाखा अभियंता आकाश ठाकरे यांनी दिली.
पुणेगाव व मांजरपाडा : मांजरपाडा (देवसाने) व पुणेगाव धरणक्षेत्रात कोसळधार सुरू असल्याने पुणेगाव धरणातून उणंदा नदीत 800 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या धरण 72.56 टक्के भरले असून, आवक पाहून विसर्ग वाढवला जाईल, असे शाखा अभियंता दंडगव्हाण यांनी स्पष्ट केले.
पालखेड धरण : ओझरखेड, वाघाड आणि तिसगाव ही धरणे 100 टक्के भरली असून, त्यांच्या सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. कोलवण, कादवा, उणंदा आणि देवनदीला आलेल्या पुराचे पाणी पालखेड धरणात जमा होत असल्याने दुपारी पालखेड धरणातून कादवा नदीत तब्बल 11,144 क्युसेक विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग रात्रीपर्यंत अधिक वाढू शकतो, अशी माहिती कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठी सर्व धरणे तुडुंब भरल्याने दिंडोरीसह चांदवड, निफाड, येवला आणि मनमाड शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न कायमचा मिटला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

धरणांचा आजचा जलसाठा
ओझरखेड 100%
वाघाड 100%
तिसगाव 100%
करंजवण 74.03%
पुणेगाव 72.56%
पालखेड 71.52%

Havoc caused by torrential rain in Dindori Taluka.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *