अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर
नाशिक : प्रतिनिधी
वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते कामे सुरू आहेत. या कामामुळे नागरिकांना त्रास होणार असल्याने यापूर्वीच आपण नाशिककरांची माफी मागितली आहे. परंतु, ही कामे होताच पुढील पंचवीस ते तीस वर्षांतील रस्त्यांचा प्रश्न मिटणार असल्याने नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे. मात्र, येत्या सात दिवसांत शहर खड्डेमुक्त केले जाईल. शनिवार(दि.1)पासून याची अंमलबजावणी केली जाईल. दिलेल्या मुदतीत खड्डे न बुजवल्यास याप्रकरणी अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सिंहस्थ कुंभमेळामंत्री गिरीश महाजन
यांनी दिला.
शहरातील खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेल्यानंतर नागरिकांचा प्रचंड रोष महापालिका प्रशासनावर व्यक्त केला जातो आहे. सत्ताधारी भाजप-शिंदेसेनेवर नागरिक यावरून आरोप करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि.31) महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयात अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेत खड्डे दुरुस्तीच्या सक्त सूचना केल्या. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आयुक्त मनीषा खत्री आदींसह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. महाजन यावेळी म्हणाले, रस्त्यांबाबत नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाची आहे. संबंधित ठेकेदार कामे करत आहे का नाही? याकडे लक्ष द्या, ठेकेदार मनमानी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, कामे करताना कोणाची वाट पाहू नका, जी मदत हवी ती शासनस्तरावर करण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. ठेकेदाराने कामे सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलकांद्वारे कामे सुरू असल्याची माहिती द्यावी. अपघात होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क रहा. खड्डे बुजविताना मुरूम, मातीचा वापर करू नका, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या सूचना महाजन यांनी केल्या. यावेळी शहरातील आ. फरांदे, हिरे, ढिकले यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था भयावह असल्याचे सांगत याप्रकरणी तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली.
ठेकेदारांसमवेत आज बैठक
शहरातील रस्त्यांसंदर्भात कामे करणार्या ठेकेदारांची बैठक मंत्री महाजन शनिवारी (दि.1) घेणार आहेत. यावेळी ते ठेकेदारांची शाळा घेऊन रस्तेकामाबाबत निष्काळजी खपवून घेणार नसल्याचा इशारा देणार आहे. महाजन शहरातच तीन दिवस मुक्काम ठोकणार आहेत.
आजपासून रस्ते दुरुस्ती : महापौर आडके
रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासन शुक्रवारी रात्रीपासूनच खड्डे पडलेल्या परिसराची पाहणी करेल. सातपूर-अंबड परिसरातील खड्डे शुक्रवारी सकाळपासून बुजवले जातील. संपूर्ण शहर खड्डेमुक्तीसाठी कामे केली जातील. कुठेही खड्डे राहणार नाहीत, यासाठी बांधकाम व ठेकेदारांनी कामे करावीत.
मंत्री भुजबळांना प्रत्युत्तर
शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी, आतापर्यंत शहराची अशी अवस्था कधी झालेली नव्हती, शहराकडे कोणी लक्ष द्यायला आहे का नाही? असा सवाल करत टीका केली होती. यावर मंत्री महाजन म्हणाले, नक्कीच शहरात अशी अवस्था कधी नव्हती, मात्र आतापर्यंत जेवढे सिंहस्थ कुंभमेळे झाले, कधीही एकाचवेळी विकासकामे झाली नसून, आता तब्बल 35 हजार कोटींची कामे होत असून, यामुळे शहराचा चेहरा पूर्ण बदलला जाणार आहे.
‘एमएनजीएल’ची मनमानी : आयुक्त खत्री
शहरात एमएनजीएलमुळे रस्ते दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. या कंपनीची कुठे कामे केली जाणार आहे, त्याबाबत पालिकेला माहिती दिली जात नाही. न विचारता थेट रस्ते खोदून ठेवले जाता असल्याची तक्रारच आयुक्त मनीषा खत्री यांनी महाजनांकडे केली. यावेळी ‘एमएनजीएल’च्या संबंधितास बैठकीसाठी बोलावून त्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले. मात्र, या कंपनीच्या अधिकार्यांना शनिवारी बोलवण्याचे निर्देश महाजनांनी दिले. रस्तेकामात कुचराई प्रकरणी ठेकेदारांना तब्बल सहा कोटींचा दंड केल्याचे आयुक्तांंनी सांगितले.
कोतकर यांना नोकरी देऊ
एक्स्लो पॉइंट येथे खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या कोतकर कुटुंबाविषयी आमची सहानुभूती असून, सदर घटना खूपच धक्कादायक आहे. कोतकर यांच्या पत्नीचे उच्च शिक्षण झाले असून, त्यांना नोकरी दिली जाईल. तसेच त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी महापौरांनी घेतली आहे. तिला दत्तक म्हणून आपण घेत असून, तिची जी काही जबाबदारी असेल ती आपली असेल, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, खड्ड्यांमुळे मृत व्यक्तींना पाच लाखांची मनपा मदत करणार असल्याचे म्हटले.
Minister Mahajan’s seven-day ultimatum for pothole removal